anekant.news@gmail.com

9960806673

उसाचा तुरा! - डॉ. एम.बी. जमदग्‍नी

यंदा ऊस अपुरा असल्याने गाळप हंंगाम जोमात आहे. तोडी जलद गतीने होत असल्याने शेतकरी खुशीत असतानाच यंदा उसाला जागोजागी फुटलेल्या तुर्‍यांनी शेतकरी नव्या विवंचनेेत सापडला आहे. या तुर्‍यामुळे उसाचे काय नुकसान होते, त्यावर उपाय कोणते या विषयी...
उशिराने सुरू झालेला यंदाचा राज्यातील ऊस हंगाम आता जोमात आहे. ऊस गाळपाला गती आली आहे. साखर पट्ट्यातील एकूणच व्यवहार गतिमान झाले आहेत. ऊस परिपक्व होेत असताना शेतकर्‍यांना उसाला तुरा फुटण्याच्या समस्येने त्रस्त केल्याचे सित आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते जानेवारीाच्या मध्यापर्यंत उसाला तुरे फुटतात. उसाला तुरा फुटला आहे. काय करायचे सांगा, अशी विचारणा सतत होत आहे. या प्रश्‍नांकडे ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सजग पाहून त्यावर योग्य ती उपाययोजना सत्वर करणे गरजेचे आहे.
कोणत्याही पिकामध्ये संकरीकरण करून अनेक चांगल्या गुणांचा एकत्रित समुच्चय असणार्‍या नवीन वाणाची निर्मिती करायची असेल, तर त्यांना फुले येणे महत्त्वाचे असते. उसामध्येसुद्धा नवीन वाण निर्माण करण्याच्या दृष्टीने तुरा येणे व त्यावर बीजधारणा होणे या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्व आहे. पण शेतकर्‍यांच्या शेतावर उसाला तुरा येणे ही बाब अनिष्ट आहे.
तुरा येण्यापूर्वी उभ्या उसाला बाणासारखी टोके (?रोइंग) दिसू लागतात आणि उसाची वाढ थांबते. अशी अवस्था आल्यानंतर तीन महिन्यात ऊस तोडला, तर उत्पादन अथवा साखरेवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. पण तुरा येऊन फुले झडू लागल्यावर उसामधल्या रसाची गुणवत्ता ढासळू लागते. साखरेचे रूपांतर ग्लुकोज व इतर प्राथमिक पदार्थांमध्ये होते. धाग्याचे प्रमाण वाढते. दशी सुटून ऊस भेंडाळतो. शेंड्याकडील डोळे फुटू लागतात.
तुरा फुटण्याची कारणे - तुरा येण्याचे प्रमाण आनुवांशिक घटकावर अवलंबून असते. को 7219, कोसी 671, को 94012 या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को 740, को 7215, को 8014, को 265 मध्ये तुरा उशिरा येतो. उसाला तुरा येण्यापूर्वी साधारणपणे 75 ते 90 दिवस पुष्पांकूर तयार होण्याची प्रक्रिया प्रामुख्याने दिवसाचा प्रकाशकाळ किती मोठा आहे यावर अवलंबून असते. प्रकाशकाळाच्या प्रभावावर दिवसाचे तापमान, जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण, पोषणद्रव्यांची उपलब्धता, पानामधील ऑक्सिजन या सजीवकाचे प्रमाण यांचा मोठा परिणाम होऊ शकतो. ऊस पीक लघुदिवसीय असून, डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत त्यास तुरा येतो. दिवसाचे तापमान 26 ते 28 अंश से., रात्रीचे तापमान 22 ते 23 अंश से., हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के दिवसाचा प्रकाशकाळ 12.30 तास आणि प्रकाशाची तीव्रता 10 ते 12 हजार फूट कँडल असे वातावरण पुष्पांकूर तयार होण्यास अनुकूल असते. असे वातावरण 10 ते 12 दिवस सलग राहिल्यास पुढे 70 ते 90 दिवसांत तूरा येतो. कोयंबतूर (11 एन) येथे अशी परिस्थिती जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यापर्यंत असू शकते. बिजापूर येथे (17 एन) ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यापासून चौथ्या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती असते. लखनौ येथे हा काळ सप्टेंबरच्या दुसर्‍या ते चौथ्या आठवड्यात येतोे. जसजसे विषुववृत्ताकडे जावे तसतसे पुष्पांकुर तयार होण्याची क्रिया लवकर घडते.
परिणामकारक घटक - हा घटक महत्त्वाचा आहे. शेतामध्ये पाणी साचून राहत असेल, तर तुरा येण्याचे प्रमाण जास्त राहते. एरवी तुरा न येणार्‍या 6304 सारख्या वाणालासुद्धा पाणथळ स्थितीत तुरा येतो.
पाण्याचा ताण - पुष्पांकु र तयार होण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडला, तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते.
नत्राची कमतरता - पुष्पांकु र तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो म्हणून या गावाच्या अक्षांशाप्रमाणे जास्तीत जास्त मोठा दिवस येण्याच्या वेळेला 25 टक्के वाढीव नत्राची मात्रा देऊन पुढे 15 दिवसांची थोडा पाण्याचा ताण दिला, तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते. साखरेचा उतारा वाढतो. पावसाळी किंवा मिरगी डोस देण्याची काही ठिकाणी पद्धत या दृष्टीने महत्त्वाची आहे.
काय करावे? - लागण उसापेक्षा खोडवा उसामध्ये तुरा येण्याचा प्रकार जास्त असतो. सुरू पूवर्र्हंगामी आणि आडसाली असा कोणताही लागण हंगाम असला तरी, ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात उसाला तुरा येतो. एप्रिल ते जून या काळात लागण केलेला ऊस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 3-4 कांड्यावर असेल आणि तुरा येण्यास अनुकूल हवामान मिळाले, तर अशा उसाला डिसेंबरपर्यंत तुरा येऊ शकतो. पण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये उगवण अथवा फुटवा अवस्था असेल तर त्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेेंबरमध्ये तुरा येत नाही. पुष्पांकूर तयार होण्याच्या काळात थोडा पाण्याचा ताण दिला, तर तुरा येणे टळते. महाराष्ट्रात हा काळ जुलेमध्ये येतो. त्या वेळी पावसाळा ऐनभरात असतो. त्यामुळे पाण्याचा ताण बसणे शक्य होत नाही आणि अपेक्षेप्रमाणे पाण्याचा ताण बसला, तर फुटवे मरू लागतात. गाळपयोग्य उसाची संख्या कमी होते. उत्पादन घटते. ही बाबसुद्धा अव्यवहार्य आहे. पॅराक्‍वाट या रसायनाची फवारणी करणे फायद्याची ठरते. पॅराक्वाट या रसायनाचे (0.35 किलो क्रियाशील घटक/हेक्टर) 3 हजार लिटर पाण्यात द्रावण करून गर्भांकुरच्या काळात फवारणी चार दिवसांच्या अंतराने दोनदा केल्यास तुरा येत नाही. अशी फवारणी भरणीच्या वेळी केली तरी फायदा होतो. शेंड्याजवळील पाने काढणे महत्त्वाचे ठरते. उसाच्या शेंड्याजवळील 3-4 पानांत पुष्पांकुर करणारी जैवरसायने तयार होत असतात. पाने पुष्पांकुर करणारी जैवरसायने तयार होत असतात. पाने पुषपांकुर तयार होण्याच्या काळात काढली, तुरा येत नाही. शिवाय नवीन पाने येऊन वाढ सूरू राहतेे. प्रत्यक्षात ही कृती व्यवहार्य नाही.
तुर्‍याचे नियंत्रण करण्याचे फायदे - उष्ण कटिबंधामध्ये तुर्‍याचे नियंत्रण केलेल्या उसाचे टनेज वाढते. साखरेचे प्रमाणसुद्धा वाढते. उसाची वाढ सुरू राहते. समशीतोष्ण कटिबंधात तुरा येवो अथवा न येवो नोव्हेंबरपासून येणार्‍या थंडीमुळे उसाची वाढ थांबलेलीच असते. त्यामुळे तुर्‍याचे नियंत्रण करून फारसा फायदा होत नाही. पण एक फायदा मात्र असा होतो की, मार्च महिन्यानंतर जरी ऊस तुटला तरी साखरेचे प्रमाण कमी होत नाही. (लेखक महात्मा फुले कृ षी विद्यापीठातील निवृत्त शास्त्रज्ञ आहेत.) (लोकसत्ता, 02.01.2024)