anekant.news@gmail.com

9960806673

इथेनॉलकडे 10 ते 12 लाख टन साखर वळविण्यास परवानगी द्यावी

अडचणीतील प्रकल्पांना दिलासा देण्यासाठी इस्माची केंद्राकडे मागणी
कोल्हापूर ः यंदाचे साखर उत्पादन फारसे कमी नसल्याने केंद्राने इथेनॉल निर्मितीसाठी 10 ते 12 लाख टन साखर वळविण्यास परवानगी देण्याची मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) केली आहे. केंद्राला साखर उत्पादनाची वाटते तितकी चिंताजनक स्थिती नसल्याने केंद्राकडून जास्तीत जास्त साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यास परवानगी मिळण्याची अपेक्षा इस्माने व्यक्त केली आहे. केंद्राने या पूर्वी यंदाच्या हंगामासाठी 17 लाख टन साखर इथेनॉलसाठी वळवण्याला परवानगी दिली आहे.
यंदा 15 जानेवारीअखेर साखरेचे उत्पादन 149 लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे उत्पादन 157 लाख टन झाले होते. यंदा 520 साखर कारखान्यांनी आपला हंगाम सुरू केला आहे. गेल्या महिन्याभरातील स्थिती साखर उत्पादनांसाठी अनुकूल ठरली आहे. उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र व कर्नाटकमध्येह यंदाच्या गळीत हंगामाने वेग घेतला आहे.
हंगाम सुरू होण्याअगोदर साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल व याचा फटका सर्वांनाच बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु जसा हंगाम पुढे जातोय तशी अपेक्षित तूट येत नसल्याचे लक्षात आले. महाराष्ट्रासारख्या राज्यात जरी गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी असले तरी जेवढी घट होण्याचा अंदाज व्यक्त होत होता तितकी घट होणार नसल्याची माहिती इस्माने दिली. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने ही बाब लक्षात घ्यावी, असे संघटनेने म्हटले आहे.
इस्माच्या सूत्रांनी सांगितले की नोव्हेंबरमध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्याचा सकारात्मक परिणाम साखर उत्पादनावर दिसून येत आहे. यामुळे यंदा साखर टंचाई होईल आणि याचा परिणाम ग्राहकांना सोसावा लागेल अशी भीती सध्या तरी दिसत नाही. अनेक राज्यांच्या साखर आयुक्तांनीही आगामी साखर उत्पादनाच्या अंदाजात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ केली आहे.
सध्याची स्थिती पाहता शेवटच्या एक दोन महिन्यात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता साखर उद्योगाने व्यक्त केली आहे. केंद्राने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातल्याने अनेक इथेनॉल प्रकल्प अडचणीत आले आहेत. या प्रकल्पांना दिलासा मिळावा यासाठी साखर उद्योगाने निरंतर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या अंतर्गत ही मागणी करण्यात आली आहे. (अ‍ॅग्रोवन, 30.01.2024)
15 जानेवारी अखेरची साखर उत्पादनाची स्थिती (लाख टन)
राज्य साखर उत्पादन साखर उत्पादन
2024 2023
उत्तर प्रदेश 45 40
महाराष्ट्र 50 60
कर्नाटक 31 33
गुजरात 4 4
तमिळनाडू 3 3
इतर राज्ये 13 14
एकूण 149 157