सुमारे दोन कोटींचे नुकसान, नजीकच्या डोंगराला वणवा लागल्याने दुर्घटना
उंडाळे ः येथील अथणी-रयत साखर कारखान्याच्या बगॅसला रविवार दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळी आग लागली. यात कारखान्याचे 6 हजार मे.टन बगॅस व कारखान्याची केबल, लाकूड, भंगार व अन्य साहित्य भस्मसात झाले. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु कारखान्याच्या मालमत्तेचे सुमारे 2 कोटींपेखा जास्त रूपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबतची माहिती अशी की अथणी रयत कारखान्याच्या परिसरातील डोंगराला वणवा लागला. वार्यामुळे आग पसरत कारखान्याच्या आवारात पोचली. घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे कर्मचारी आग विझवण्यासाठी आटापिटा करत होतेे. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने बगॅसने पेट घेतल्याने अग्निशमक दलांना पाचारण करण्यात आले.
ही आग विझवण्यासाठी कृष्णा साखर कारखाना रेठरे, बाळासाहेब देसाई कारखाना मरळी, कृष्णा हॉस्पीटल, विश्वास साखर कारखाना, राजाराम बापू साखर कारखाना इस्लामपूर, कर्हाड नगरपरिषद यासह रयत सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा तब्बल 6-7 तास आग विझवण्याचा प्रयत्न करत होती.
या आगीत कारखान्याने या वर्षी तयार केलेले व रचून ठेवलेले बगॅस आणि बॉयलरसाठी लागणारे लाकूड (जळण) व अन्य कारखान्याचे साहित्य आगीत जळून खाक झाले. ही आग कारखान्याच्या मोलॅसिसच्या टँक शेजारी असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अग्निशमन दलाने मोलॅसिसच्या टँक व त्याच्या बाजूची आग विझविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत त्या परिसरातील आग क्षमतवण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा आग विझली. परंतु या आगीत कारखान्याचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. (सकाळ, 09.04.2024)