anekant.news@gmail.com

9960806673

महाराष्ट्राच्या साखर उत्पादनात अनपेक्षीत वाढ-राज्याचे साखर उत्पादन 95 लाख टन अपेक्षीत-विस्माचा अंदाज

पुणे -दि.02 महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर मधील बिगर मोसमी/अवकाळी मोठया पावसामुळे ऊसाची उत्पादकता व साखर उता-यामध्ये हंगाम पूर्वीच्या 88 लाख मे.टन अंदाजापेक्षा 10 ते 12 टक्के वाढ झाल्याने एकूण साखर उत्पादनात 7.5 टक्के वाढ होवून महाराष्ट्राचे चालु हंगामातील साखर उत्पादन 95 लाख टन होईल असा विश्वास विस्माचे अध्यक्ष श्री.बी.बी.ठोंबरे यांनी दि. 2 जानेवारी 2024 रोजी झालेल्या विस्माच्या कार्यकारी मंडळाच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
विस्मा कार्यकारी मंडळाचे बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांच्या 31 डिसेंबर 2023 अखेर झालेले प्रत्यक्ष व अपेक्षीत गाळप, साखर उत्पादन व साखर उता-याचा कारखाना निहाय आढावा घेतला असता राज्यात सध्या 96 सहकारी व 99 खाजगी असे एकूण 195 साखर कारखाने कार्यरत असून त्यांची दैनंदीन गाळप क्षमता 9.00 लाख मे.टन प्रतिदिन आहे. सुरूवातीस राज्याचा गळीत हंगाम अंदाजे 90 ते 100 दिवसांचा अपेक्षीत होता. मात्र प्रत्यक्षात डिसेंबर अखेर एकूण 946 लाख मे.टन ऊस उपलब्धते मध्ये 5 टक्के वाढ होवून 993 लाख टना पैकी डिसेंबर अखेर 428 लाख टन ऊसाचे गाळप झाले असून 38.20 लाख टन साखर निर्मिती ही 60 दिवसांमध्ये झालेली आहे व अद्याप 565 लाख टन गाळप बाकी आहे.
गैरमोसमी पावसामुळे प्रति हेक्टरी ऊसाच्या उत्पादनात 8 ते 10 टक्के वाढ झाल्याने एकूण उपलब्ध ऊसामध्ये 5 टक्के वाढ झाल्याने एकूण गाळपाचे दिवस 100 वरून 125 ते 130 दिवस अपेक्षीत आहेत. त्यामुळे डिसेंबर अखेर फक्त 40 टक्के ऊस गाळपातून 38 लाख टन साखर उत्पादन झाले असल्याने उर्वरीत 60 टक्के ऊस गाळपातून एकूण 95 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज अत्यंत वास्तवीक व खरा ठरू शकतो.
साखर उत्पादनात वाढ होण्याची दोन प्रमुख कारणे असल्याचे श्री.ठोंबरे यांनी सांगितले. त्यामध्ये अवकाळी पावसामुळे प्रति हेक्टर ऊस उत्पादनात झालेली वाढ हे प्रमुख कारण असून त्याच बरोबर केंद्र शासनाने 7 डिसेंबर 2023 च्या आदेशान्वये सिरप पासून ईथेनॉल उत्पादनास घातलेली बंदी व त्यामुळे ईथेनॉल कडे वळवण्यात आलेल्या साखरेच्या वापरात मोठी घट हे आहेत. हंगाम सुरूवातीस महाराष्ट्रात 88 लाख टन निव्वळ साखरेचे उत्पादनाचा अंदाज विस्मा, साखर आयुक्तालय व साखर संघाने व्यक्त केलेला होता व अंदाजे 8 ते 10 लाख टन साखर ईथेनॉलकडे वळवली जाणे अपेक्षीत होते. मात्र वरील परिस्थिती मुळे आत्ता चालू हंगामात निव्वळ साखरेचे उत्पादन 95 लाख टन होण्याचा अंदाज विस्मा व साखर संघ यांचे संयुक्त अभ्यासातून वर्तविण्यात येत असल्याचे श्री.ठोंबरे यांनी सांगितले.
राज्यासह देशातील साखर उत्पादना बाबत विचारले असता ठोंबरे म्हणाले की, मागील वर्षीच्या साखर उत्पादनामध्ये प्रामुख्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती मुळे महाराष्ट्र व कर्नाटक या मुख्य साखर निर्मिती राज्यामध्ये साखरेच्या उत्पादनाचा अंदाज कमी वर्तवण्यात आला होता. मात्र महाराष्ट्रा प्रमाणेच कर्नाटक व गुजरात राज्यामध्येही प्रचंड मोठया प्रमाणात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने त्याही राज्यांमध्ये ऊसाच्या प्रति हेक्टरी उत्पादनात 8 ते 10 टक्के वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे. देशातील दुस-या क्रमांकाचे साखर उत्पादन असणा-या उत्तर प्रदेशामध्ये पुरेसा पाऊस व अनुकूल वातावरणामुळे मागील वर्षाच्या साखर उत्पादनामध्ये सुरूवातीसच 10 टक्के वाढ अपेक्षीत होती. मात्र प्रत्यक्षात डिसेंबर 2023 अखेर उत्तर प्रदेशात 35 लाख टन साखर उत्पादन झालेले असून हंगाम अखेर 120 ते 125 लाख टन साखर उत्पादन अपेक्षीत असल्याचे संबंधीत राज्यातील साखर कारखाना संघटनांनी सांगितल्याचे ठोंबरे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक व गुजरात या प्रमुख 80 टक्के साखर उत्पादन करणा-या राज्यांमधील प्रत्यक्ष व अंदाजीत साखर उत्पादन वाढ विचारात घेता देशातील निव्वळ साखर उत्पादन 320 लाख टन निश्चीतपणे होईल असेही विस्मा अध्यक्ष श्री.ठोंबरे यांनी सांगितले.
केंद्र शासनाने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात हंगाम पूर्व एकूण साखर उत्पादन 290 लाख टन गृहीत धरून ईथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमाला बगल देवून ऊसाचा रस व सिरप पासून ईथेनॉल निर्मितीस घातलेल्या बंदीचा पुनर्रविचार करण्या बाबतची विनंती केंद्र सरकारकडे करणार असल्याचे श्री.ठोंबरे म्हणाले. कारण देशांतर्गत वापरासाठी एकूण 275 ते 280 लाख टन साखर लागते व प्रत्यक्ष या वर्षीचे अपेक्षीत साखर उत्पादन 320 लाख टन निश्चीतपणे होणार असल्याने देशांतर्गत वापरासाठी मुबलक साखर उपलब्ध होते. त्यामुळे साखरेचा तुटवडा निर्माण होवून भाववाढ होण्याची भिती राहणार नाही. तसेच वाढीव 20 ते 25 लाख टन साखर ज्यादा उपलब्ध झाल्याने सदर साखरे पासून मुळ केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भरतेच्या ‘‘ईथेनॉल मिश्रणाचे’’ प्रकल्पासाठी पुन्हा मान्यता देवून साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्याची आग्रहाची विनंती विस्मा अध्यक्ष श्री.ठोंबरे यांनी केंद्र शासनास केल्याचे सांगितले. (प्रेसनोट, 03.01.2024)