anekant.news@gmail.com

9960806673

ब्राझीलची वाढती ताकद निर्यातीसाठी धोक्याची

इस्माचे पदाधिकारी रवी गुप्ता यांचे मत
पुणे ः जागतिक साखर उद्योगातील बलाढ्य ब्राझील आपली क्षमता सातत्याने वाढवतो आहे. साखर निर्मितीवर ब्राझिलने दिलेला भारतीय साखर निर्यातीला धोक्याचा ठरू शकतो, अशी भीती भारतीय साखर कारखाने संटनेचे (इस्मा) कार्यकारी समिती सदस्य रवी ग ुप्‍ता यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत शनिवार दि. 13 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या साखर कारखान्यांमधील आर्थिक शिस्त व व्यवस्थापन या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होेते. अध्यक्षस्थानी जागतिक साखर उद्योगाचे अभ्यासक व जर्मनीतील बार्टेनचे संपादक अरविंद चुडासामा होेते.
ब्राझीलने ऊस उत्पादन वाढवून 650 लाख मे.टनावर नेले आहे. इथेनॉलच्या तुलनेत साखर उत्पादनाचे प्रमाण वाढवून 48.5 टक्के केले आहे व ते पुढील वर्षी 5 टक्क्यांपर्यंत राहू शकते. साखर निर्यात वाढवून दरमहा आता 3.5 लाख मे.टनापर्यंत नेली आहे. ब्राझीलकडून इथेनॉल निर्मितीदेखील वाढवली जात आहे. ब्राझीलची घौडदौड सुरू असताना थायलंड, भारत, युरोपातील साखर निर्मितीत घट होत आहे, असेही निरीक्षण श्री. गुप्ता यांनी वर्तविले.
देशातील साखर कारखान्यांनी व्यवसाय व कामकाजात सुधारणा केल्यामुळे रोख तरलता (कॅश लिक्विडीटी) वाढली. त्याचा फायदा शेतकर्‍यांना ऊस दर अदा करण्यात होतो आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले.
साखर साठ्याचे वेळेत विक्री व्यवस्थापन होत असल्यामुळे खेळत्या भांडवलावरील व्याजाचा भार कमी झालेला आहे. कारखान्यांनी गेल्या सहा वर्षात 349 लाख टन साखर निर्यात केली. त्यामुळे इंडोनेशिया, श्रीलंका, बांगलादेश, इराक, सौदी अरेबिया यासारख्या देशांमध्ये बाजार व्यवस्था तयार झाली, असे ते म्हणाले.
चालू 2023-24 मधील हंगामात देशात 4340 लाख टन ऊस उपलब्ध होईल. 520 साखर कारखान्यांमधील गाळपातून 305 लाख टन साखर तयार होईल, असाही अंदाज श्री. नाईकनवरे यांनी वर्तविला.
कृत्रिम बुद्धिमत्ता दिशा देईल - ऑक्फर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर म्हणाले, की भारताच्या ऊस शेतीला दिशा देण्याची क्षमता कृत्रिम बुत्रिमत्तेत (एआय) आहे. या तंत्रावर आधारित एक व्यावसासिक प्रारुप आम्ही तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी व्हीएसआयच्या सहकार्यातेन केली जाणार आहे. एआयच्या मदतीने ऊस उत्पादनातील अडथळे अचूकपणे शोधले जातील. त्यातून मशागत खर्चात बचत, उत्पादनात वाढ आणि पिकात गुणवत्ता वृद्धी असा तिहेरी हेतू साध्य होईल.
आर्थिक शिस्त पाळावी लागेल - दालमिया शुगर उद्योगाचे सहायक कार्यकारी संचालक संतोष कुंभार म्हणाले, साखर कारखान्यांनी आर्थिक शिस्त पाळण्यासाठी नियमित सेवांचा आढावा दर आठवड्याला तर आर्थिक आढावा दरमहा घेण्याची गरज आहे. सॅपसारखी गुणवत्तापूर्ण सॉफ्टवेअर वापरायला हवीत. कारखान्यांनी वीज व वाफ वापरातील यंत्रांचे आधुनिकीकरण करायला हवे. प्रत्येक खाते प्रमुखाला खर्चबचतीचे उद्दिष्ट देत त्याचा आढावा दरमहा घ्यायला हवा. (अ‍ॅग्रोवन, 14.01.2024)