anekant.news@gmail.com

9960806673

ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

उत्पादनात 30 टक्के वाढ, जागतिक बाजारात दबदबा

कोल्हापूर ः यंदाचा ब्राझीलचा साखर हंगाम धडाक्यात सुरू झाला आहे. यंदा ब्राझीलमध्ये साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढलेे आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात साखरेचे उत्पादन 7 लाख 10 टन इतके झाले आहे. साखर उद्योगाच्या अपेक्षेपेक्षा ही वाढ अधिक आहे. युनिका या संस्थेने ही माहिती दिली आहे.

ब्राझीलमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत गेल्या वर्षीच्या 14 टक्के अधिक उसाची तोडणी झाली आहे. ब्राझीलमध्ये गत हंगाम (2023-24) गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चांगला गेला. भारतासह अन्य देशांमध्ये कमी साखर उत्पादन झाल्याने ब्राझीलच्या साखरेला चांगली मागणी राहिली. गेल्या वषी सुरूवातीपासूनच साखरेचे उत्पादन चांगले राहिले. यामुळे निर्यातही चांगली राहिली. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर चांगले असल्याने याचा सगळा फायदा ब्राझीलला झाला. यंदाही अन्य देशांमध्ये साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने ब्राझीलने यंदाही इथेनॉलपेक्षा साखरेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.

अनेक कारखाने इथेनॉलपेक्षा साखर निर्मितीला पसंती देत असल्याने यंदाही ब्राझीलमध्ये साखर उत्पादन चांगले राहील, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत साखर हंगाम सुरू होता. ब्राझीलची साखर अखंडपणे जागतिक बाजारपठेत जात आहे. भारतासह अन्य कोणत्याही प्रमुख देशातील साखर सध्या तरी जागतिक बाजारपेठेत जाण्याची शक्यता नाही. यामुळे सध्या तयार होणारी साखर काही दिवसांतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाईल, अशी चिन्हे आहेत. यामुळे यंदाही तेथील साखरेला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे.

देशातील नेमके उत्पादन, निर्यातीबाबत अनिश्‍चितता - भारतात यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. यामुळे पुरेसा पाऊस झाल्याने उसाची चांगली वाढ होऊन ऊस व पर्यायाने साखरेचे उतपादन वाढू शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडी कमी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्याने सध्या ऊस जगविणे अडचणीचे ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर नेमके किती साखर उत्पादन होईल व जादा साखर निर्मिती झाल्यास केंद्र निर्यातीला परवानगी देईल का, याबाबत कसलाच अंदाज नाही. यामुळे भारतीय साखर नजीकच्या काळात जागतिक बाजारपेठेत किती प्रमाणात जाईल, याबाबत जागतिक बाजारात कसलीच माहिती नाही. यामुळे सध्या तरी ब्राझीलच्या साखरेवरच जगाची स्थित राहील. (अ‍ॅग्रोवन, 28.04.2024)