कोगनाळी ः साखर कारखान्याचा यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळीसह सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकरी खोडवा ऊस गळीतास त्वरित पाठवून त्या क्षेत्रातील रब्बी पिकांचा हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या परिसरातील शेतकरीवर्ग उसाची लावण आणि खोडवा ही दोन पिके घेतो. खोडवा ऊस गळितास गेल्यानंतर त्या जमिनीत गहू, हरभरा ही तीन ते साडेतीन महिन्यात येणारी रब्बी पिके घेण्याची पद्धत या परिसरात रूढ आहे. दरवर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो. पण यंदा तो नोव्हेंबरच्या तिसर्या आठवड्यानंतर सुरू झाल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसही विलंब झाला आहे.
बहुतांश शेतकरी खोडवा उसाच्या नोंदीचा करार, आपले गाव, कार्यक्षेत्र असलेल्या अनेक कारखान्यांकडे करतो. यामागे लवकरात लवकर गळितास नेणार्या साखर कारखान्यांकडे पाठविणे हा उद्देश असतो. मात्र यंदा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस फडात ओल आहे. त्यामुळे मशिन तोडणीस अडचणी येत आहेत. तसेच ऊसतोडणी मजुरांनी मजुरीवाढ प्रश्नी तोडणी बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे रब्बी पिकांची पेरणी करण्याच्या उद्देशाने खोडवा ऊसतोडणी त्वरित करून घेण्यासाठी शेतकर्यांची साखर कारखान्यांच्या शेती विभागीय कार्यालयाकडे वर्दळ वाढली आहे. (सकाळ, 02.01.2024)