anekant.news@gmail.com

9960806673

बी हेवी मोलॅसिस वापरास परवानगीने दिलासा

700 कोटी रूपयांची रक्कम वापरात येणार, साखर कारखान्यांना मिळणार संजीवनी

जयसिंगपूर ः केंद्राने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी 6.7 लाख टन बी हेवी मोलॅसिस वापरण्याची परवानगी दिली आहे. याचा फायदा साखर कारखान्यांना होणार आहे. साखर उद्योग या मागणीसाठी सातत्याने आग्रही होता. साखरेच्या किमती अपेक्षित प्रमाणात वाढत नसल्याने धास्तावलेल्या साखर कारखान्यांना या निर्णयाने संजीवनी मिळाली आहे. आसवनीशिवाय 31 मार्चअखेरचया बी हेवी मोलॅसिसच्या मात्रेतून तयार होणार्‍या इथेंनॉलची खरेदी करण्याचे आदेश इथेनॉल खरेदी करण्याचे आदेेश पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे पारित करण्यात येत आहेत.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माहितीनुसार, या परवानगीने बी हेवी मोलॅसिसच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेल्या सुमारे 700 कोटी रूपयांची रक्कम वापरता येणार आहे. त्यातून तयार होणार्‍या 38 कोटी लिटर इथेनॉलच्या विक्रीतून 2300 कोटी रूपये इतकी रक्कम आसवनी प्रकल्प असणार्‍या कारखान्यांना उपलब्ध होईल. यामुळे साखरेचे साठे कमी होण्यात व फलस्वरूप स्थानिक साखरेचे दर सुधारण्यात मदत होईल, असा दावा महासंघाने केला आहे.

डिसेंबर 2023 मध्ये केंद्र शासनाने घेतलेल्या आढाव्यामध्ये देशातील साखरेची उपलब्धता कमी राहण्याचा आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात अवाजवी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला. हा अंदाज प्रमाणभूत मानून केंद्राने 7 डिसेंबर 2023 च्या आदेशाद्वारे उसाचा रस/साखरेचा अर्क तसेच बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस तातडीने बंदी आणली. या निर्णयामुळे साखर उद्योगात खळबळ उडाली.

कारखान्यांमध्ये तयार असलेले इथेनॉल, इथेनॉलसाठी लागणारे बी हेवी मळीचे साठे तसेच तेल कंपन्यांशी केलेले करार या सगळ्यांवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. त्याचसोबत इथेनॉलनिर्मिती राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळालेले प्रोत्साहन आणि आश्‍वासनावर साशंकता निर्माण झाली. या क्षेत्रात झालेली गुंतवणूक धोक्यात येण्यासारखी परिस्थिती उद्भवली.

या पार्श्‍वभूूमीवर इथेनॉल निर्मितीवरील बंधने उठविण्याची मागणी होत होती. केंद्राने 15 डिसेंबर 2023 च्या सुधारित आदेशानुसार जास्तीत जास्त 17 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याची परवानगी देण्यात आली. याच दरम्यान, डिसेंबरमध्ये आलेल्या पावसामुळे उसाचे व साखरेचे उत्पादन अनपेक्षीत वाढले. परिस्थिती बदलल्याने इथेनॉल निर्मितीवरील नियम आणखी शिथिल करावेत या मागणीने जोर धरला. साखरेची उपलब्धता अगोदरच्या अंदाजापेक्षा 20 ते 25 लाख टनाने वाढली.

पाठपुरावा ठरला महत्त्वाचा - सुधारित वाढीव साखर उपलब्धतेची आकडेवारी, देशभरातील कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिलेल्या सुमारे 7 लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या विषयाच्या मंत्री गटाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे 24 फेब्रुवारीला केली होती. केंद्राने परिस्थितीचा आढावा घेऊन अखेर इथेनॉल उत्पादनासाठी 6.7 लाख टन बी हेवी मोलॅसिस वापरण्याची परवानगी दिली. (पुढारी, 05.05.2024)