anekant.news@gmail.com

9960806673

वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही सुधारणा

पंधरवड्यात प्रतिक्विंटल 100 रूपयांची वाढ

कोल्हापूर ः वाढत्या उन्हामुळे साखरेच्या मागणीत वाढ होत असल्याने देशांतर्गत बाजारात साखर दरावर याचा सकारात्मक परिणाम होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून साखरेच्या दरात प्रतिक्विंटल 100 रूपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात साखरेचे दर 3600 ते 3650 रूपयांपर्यंत पोहोचले आहेत. एप्रिलच्या पूर्वाधात साखरेचे दर 3550 रूपयांपर्यंत होते. एप्रिलच्या उत्तरार्धापासून साखरेच्या दरात वाढ होण्यास सुरूवात झाली. सध्या कडक उन्हामुळे विशेष करून शीतपेय उद्योगांकडून साखरेला सातत्याने मागणी वाढत आहे.

केंद्राने या महिन्यात साखरेचा कोटा 27 लाख टनांचा दिला आहे. यामुळे साखर बाजारात मुबलक उपलब्ध आहे. साखरेची टंचाई भासण्याची शक्यता नसल्याने आइस्क्रीम व शीतपेय उद्योगांकडून टप्प्याटप्प्याने खरेदी होत आहे. सध्या देशभरातच उन्हाळा जादा आहे. महाराष्ट्रात तर सातत्याने 40 अंश सेल्सीअसच्या वर आहे.

शीतपेयांसह आइस्क्रीम, सरबत, ज्यूस आदींच्या मागणीतही एकदम वाढ झाली. अनेक कंपन्यांनी एप्रिलच्या सुरूवातीला खरेदी केंलेल्या साखरेचा साठा संपला. कंपन्यांनी एप्रिल उत्तरार्धापासून साखरेच्या खरेदीला प्राधान्य दिले. यामुळे कारखान्यांकडून साखर विक्रीच्या निविदा सातत्याने निघत आहेत. सध्या एमएसपीपेक्षा 400 रूपयांनी साखरेच्या दरात वाढ आहे.

पावसाळा सुरू झाला, की साखरेची मागणी कमी येईल या शक्यतेने अनेक कारखान्यांनी दिलेल्या कोट्याइतकी साखर विक्रीस काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहे. अर्थात, मागणीही असल्याने साखरेचे दर सध्या तरी समाधानकारक आहेत. कोटा वाढविल्याने खरेदी कमी होईल यामुळे दर फारसे वाढणार नाहीत असा अंदाज साखर उद्योगाचा होता, पण वाढता उन्हाळा साखर उद्योगाच्या मदतीला धावून आल्याने कोटा वाढवूनही साखरेच्या दरात वाढ पाहावयास मिळत आहे.

फेब्रुवारीपासून एप्रिल अखेरपर्यंत साखरेच्या दरात क्विंटलला 200 रूपयांच्या पुढे वाढ आहे. सध्या उत्तर प्रदेश वगळता देशातील हंगाम संपला आहे. यामुळे मे महिन्यात मोठ्या प्रमाणात साखर निर्मिती होईल अशी स्थिती नाही. परिणामी, किमान पुढील 15 दिवस तरी साखरेचे भाव चांगले राहतील अशी चिन्हे आहेत. (अ‍ॅग्रोवन, 06.05.2024)