हजार हेक्टर ऊस शिल्लक ः तोडणीसाठी लूट
कडेगाव ः साखर कारखान्यांचा गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून मार्चअखेर जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांचे धुराडे बंद होण्याची शक्यता आहे. ऊस गाळपास पाठवण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू आहे. त्याचा गैरफायदा घेऊन ऊसतोडणी मजूर व मशीनचालकांकडून शेतकर्यांची आर्थिक लूट सुरूच आहे.
तालुक्यातील उसाचे क्षेत्र अत्यल्प राहिले असून अद्यापही जवळपास 900 ते 1000 हेक्टर ऊस शिल्लक आहे. सध्या सोनहिरा, उदगिरी, क्रांती, जरंडेश्वर, सह्याद्री, कृष्णा, जयवंत, गोपूज, नागेवाडी, रायगाव शुगर्स, विश्वास, दालमिया, शिवनेरी या 12 कारखान्यांकडून ऊसतोडणी सुरू आहे.
गळीत हंगाम अंतिम टप्प्यत आल्याने ऊस गाळपास लवकर पाठवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. अशा रीतीने ऊसतोडीसाठी शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला आहे. ताकारी व टेंभू योेजनेचे पाणी आल्याने येथे उसाचे क्षेत्र वाढले आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अद्यापही अनेक शेतकर्यांचा ऊस शेतात उभा आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. अशा स्थितीत कारखान्यांचे ऊसतोडणी मजूर गावी परतू लागले आहेत. उर्वरित ऊस कसा तोडायचा, असा प्रश्न आहे. सध्या मजूर आहेत, त्यांची मनधारणी करण्याची वेळ कारखान्याच्या शेती विभागावर आली आहे. शेतकरीही ऊस घालवण्यासाठी कारखान्यांच्या गट कार्यालयाला फेर्या मारत आहेत. तोड मिळालीच तर शेतकर्यांना पाच ते सात हजार रूपये मजुरांना द्यावे लागत आहेत, वाहनचालकांची एंट्री वेगळीच. सध्या मजुराअभावी कारखान्यांना पुरेसा ऊस पुरवठा होत नाही. ऊसतोडणी तत्काळ व्हावी, यासाठी मजूर ऊस पेटवून त्याची तोडणी करतानाचे चित्र आहे. (सकाळ, 06.04.2024)