आजर्यात टनामागे 300 रूपये दर, ट्रकला 6 हजार तर छकडीला 3 हजार दर
आजरा ः तालुक्यात ऊसतोड कामगारांकडून शेतकर्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. ट्रकला 6 हजार आणि छकडीला 3 हजार रूपये दिले जात आहेत. टनाला 300 रूपये खुशाली झाल्याने शेतकरी बेजार झाला आहे. तालुक्यात ऊसतोडीस विलंब होत असल्याने शेतकर्यांच्या आगतिकतेचा गैरफायदा ऊसतोड कामगार घेत आहेत.
आजरा कारखान्याकडे तांबाळे, दौलत, गडहिंग्लज, संताजी घोरपडे कारखान्याच्या टोळ्या तालुक्यातील परिसरामध्ये आहेत. नेहमीप्रमाणे यावर्षीही परजिल्ह्यातील तोडणी ओढणी यंत्रणेने कारखान्यांना चुना लावल्याने ऊस आहे, पण यंत्रणा नाही, अशी विचित्र संकटात कारखाना व्यवस्थापन सापडले आहेत.
आजरा कारखान्याने कार्यक्षेत्रात व बाहेरील कार्यक्षेत्रात समप्रमाणात टोळ्या घातल्या आहेत. यावर्षी गाळप सुरू होताना कारखाना निवडणूक झाली. त्यामुळे तोडणी ओढणीकडे दुर्लक्ष झाले. कार्यक्षेत्रातील ऊस उचलण्यास विलंब होत असल्याने शेतकरी बाहेरील कारखान्यांना ऊस पाठवित आहेत. परिणामी ऊसतोड कामगारांनी मनमानी पद्धतीने खुशालीचा दर वाढवला आहे.
टनाला 300 रूपये खुशाली केल्याने शेतकर्यांच्या पदरात टनामागे 2600 ते 2700 रूपयेच दर पडणार आहे. ट्रक व ट्रॅक्टर चालकांची एंट्री वेगळीच आहे. पूर्वी शेतकरी स्वखुशीने सहानुभूती म्हणून नाममात्र खुशाली देत असत. आता मात्र लुटीच्या स्वरूपात खुशाली घेतली जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
फेबिुवारी महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी तालुक्यातील बहुतांश ऊस हा अद्याप शेतातच उभा आहे. ऊसतोडणीसाठी यंत्रणेची मागणी करण्याकरिता आजरा साखर कारखान्यासह विविध कारखान्यांच्या सेंटर ऑफिसचे उंबरे शेतकरी झिजवू लागले आहेत. आर्थिक पिळवणूक व ऊसतोड विलंबामुळे शेतकरी हैराण झाला आहे. (पुढारी, 06.02.2024)