आयुक्तालयाकडून पडताळणी सुरू, निवृत्तीचे वय वादग्रस्त ठरल्याचा परिणाम
पुणे ः राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या (एमडी) वयाचा तपशील सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तालयाने दिले आहेत. एमडीने वयाची 60 वर्षे पूर्ण होताच निवृत्त करावेे, अशी अपेक्षा या पदासाठी पात्रताधारक असलेल्या इतर उमेदवारांची आहे. परंतु निवृत्त होणार्या एमडीला राज्याच्या साखर आयुक्तांनी ठरविल्यास अजून एक वर्षाची मुदतवाढ देता येईल, असा निर्णय 2015 मध्ये राज्य शासनाने घेतला.
विशेष म्हणजे अशा एमडीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ हवी असल्यास सहकार मंत्रालय मान्यता देऊ शकते, अशीही मुभा दिली. त्यामुळे मर्जीतील एमडीला थेड वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत कायम ठेवण्याचा अधिकार साखर कारखान्यांना मिळाला आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्याच्या एमडीला थेट वयाच्या 63 व्या वर्षीदेखील एमडी करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला. त्यामुळे या निर्णयाला एका शेतकर्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत आव्हान दिले. न्यायालयाने या प्रकरणात सहकार विभागाचा आदेश रद्द केलाच, परंतु बेकायदेशीरपणे 63 व्या वर्षीदेखील एमडीला मुदवाढ देणार्या यंत्रणेवर न्यायालयाने कडक ताशेरे ओढले. ही चूक राज्यात इतरत्र होऊ नये म्हणून आता साखर आयुक्तालयाने सर्व एमडींच्या वयाचा तपशील मागवला आहे.
साखर आयुक्तालय गोळा करतेय ही माहिती - एमडीची जन्मतारीख, 60 वर्षे पूर्ण होत असलेली तारीख, पॅनेलवर आल्यानंतर कार्यकारी संचालक किंवा महाव्यवस्थापक म्हणून केलेली सेवा, 60 वर्षांनंतर मुदतवाढ दिली असल्यास आयुक्तालयाचे मंजुरीचे पत्र, 62 वर्षापर्यंत मुदतवाढ दिली असल्यास शासनाचे मंजुरीचे पत्र, 62 वर्षानंतरदेखील मुदतवाढ दिली असलयास त्याबाबतचे आदेशपत्र, वेतन मंजुरीचा तपशील आदी माहिती गोळा केली जात आहे.
प्रभारी एमडीची स्वतंत्र यादी तयार होणार - राज्यात ज्या सहकारी साखर कारखान्यांनी पॅनेेलवरील एमडी नेमलेले नाहीत व काही ठिकाणी प्रभारी एमडी कार्यरत आहेत अशा कारखान्यांची देखील स्वतंत्र यादी तयार करण्याचे आदेश साखर आयुक्तालयाने दिले आहेत. (अॅग्रोवन, 03.01.2024)