anekant.news@gmail.com

9960806673

320 कोटींचे अनुदान थकले

ऊसतोडणी यंत्र खरेदी ः शेेतकर्‍याना प्रतीक्षा
जयसिंगपूर ः यावर्षी कारखानदारांचे ऊसतोडीचे वेळापत्रक कोलमडले आहे. मशीनद्वारे ऊस तोडणीकडे कल जाणवत आहे. राज्यात सुमारे 1100 शेतकर्‍यांनी ऊसतोडणी यंत्र खरेदी केले. यासाठी सरकारने 320 कोटीचे अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र अद्याप ते शेतकर्‍यांना मिळालेले नाही. त्यामुळे ऊसतोडणी यंत्रधारकांना अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. उसाचे क्षेत्र वाढले आहे.यांत्रिकी पद्धतीने ऊसतोडीसाठी प्राधान्य दिले जात आहे. राज्यभरात 1100 हून अधिक शेतकर्‍यांनी ऊसतोड यांत्रिकी मशीन खरेदी केली आहे.
ऊसतोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करून मजुरांच्या समस्येवर मात करणे, ऊस उत्पादकता आणि साखर उतारा यात वाढ करणे, मनुष्यबळाचा वापर आणि वाढणारा खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण वाढवणे, ऊसतोडणी यंत्राचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी वैयक्तिक शेतकरी गट, साखर कारखाने यांना सहाय्य करणे असा उद्देश शासनाने ठेवला आहे. त्यामुळे शासनाने अनुदान घोषीत केले असले तरी अद्याप मशीन खरेदीदार शेतकर्‍यांना मिळालेले नाही. त्यामुळे हे अनुदान तत्काळ वितरित करण्याची मागणी आहे.
* ऊसतोडणी यांत्रिकी मशीन, इन्फिल्डर मशीन घेण्यासाठी 1.35 कोटी रूपये खर्च आहे. केंद्र सरकारचा 60 टक्केप्रमाणे हिस्सा 21 लाख तर राज्य सरकारचा हिस्सा 40 टक्केप्रमाणे 14 लाख असे एकूण 35 लाख अनुदान यांत्रिकी मशीन खरेदीदार शेतकर्‍याला शासनाकडून मिळणार आहे. दरम्यान ऊसतोड यांत्रिकी मशीनची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान देण्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेतून 192 कोटी 78 लाख तर राज्य सरकारने 128 कोटी असा निधी मंजूर केला आहे. खरेदीदार अद्याप अनुदान मिळाले नाही.
ऊसतोडणी मशीन खरेदी केले आहे. मशीन खरेदी करताना संबंधित कंपनीने अनुदान मिळणार असल्याचे सांगून शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. अनेक महिन्यापासून यांत्रिक मशीन खरेदीदार शेतकर्‍यांना अनुदान मिळालेले नाही. मशीन खरेदी करताना जीएसटी भरला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित अनुदान द्यावे. - संजय चौगुले, यांत्रिकी मशीन खरेदीदार शेतकरी (सकाळ, 09.02.2024)