anekant.news@gmail.com

9960806673

सोलापूर जिल्ह्यात 17 कारखान्यांनी यंदाही दिले नाहीत एफआरपीनुसार पैसे


काही कारखान्यांकडून महिन्यांपासून पैसे जमा होईना
सोलापूर ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे पहिले पाढे पंचावन्न असा प्रकारही यंदाही सुरू आहे. सुरूवातीला कोणी 5 तर कोणी 10 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करू अशा बढाया मारणार्‍यांनी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील उसाचे पैसे जमा केले नाहीत. साखर आयुक्तांच्या अहवालात जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांनी उसाचे 75 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 35 साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला आहे. त्यामध्ये मातोश्री लक्ष्मी शुगरही उशिरा सुरू झाला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात गाळपासाठी आणलेल्या उसाचे शेतकर्‍यांना एफआरपीनुसार पैशाची माहिती तयार केली आहे. त्यामध्य सोलापूर जिल्ह्यातील गाळप घेतलेल्या 34 पैकी 14 साखर कारखान्यांनी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात गाळपाला आणलेल्या उसााचे पैसे दिले आहेत. तर तीन साखर कारखान्यांनी 12 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली आहे.
100 टक्के रक्कम देणारे कारखाने ...
* जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, श्री पांडुरंग श्रीपूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, गोकुळ धोत्री, ओंकार चांदापुरी, जयहिंद आचेगाव, विठ्ठल रिफायनरी, भीमा सहकारी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे, सीताराम महाराज खर्डी, श्री शंकर, येडेश्‍वरी खामगाव या साखर कारखान्यांनी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे ऊस बिल पेड केले आहे.
* सिद्धनाथ तिर्‍हे (99 टक्के), दी सासवड माळी शुगर (96 टक्के) व आष्टी शुगर (92 टक्के) , बबनराव शिंदे 81 टक्के एफआरपी दिली आहे.
* उर्वरित 17 साखर कारखान्यांनी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील उसाचे एफआरपीच्या 75 व त्यापेक्षा कमी पैसे शेतकर्‍यांना दिले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
राज्यातील 89 कारखान्यांकडून पूर्ण बिल - राज्यात यंदा सुरू झालेल्या 197 पैकी 89 साखर कारखान्यांनी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात गाळप केलेल्या उसाचे संपूर्ण पैसे दिले आहेत. 22 साखर कारखान्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक तर 50 साखर कारखान्यांनी 60 टक्क्यांपर्यंत रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली आहे.
डिसेंबरपर्यंत उसाचे पैसे देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. यात थकीत असलेल्या सर्व कारखान्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सुनावणी घेऊन पुढील कार्यवाहीसाठी साखर आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येईल. यावर्षी एफआरपी थकविणार्‍यांवर लवकर कारवाई करीत आहोत. - पांडुरंग साठे, सह आयुक्त प्रादेशिक (लोकमत, 15.01.2024)