anekant.news@gmail.com

9960806673

आर्मस्ट्राँंग साखर कारखान्यास नाशिक जिल्हा बंँकेची नोटीस

मालेगाव ः कर्जाच्या वाढत्या थकबाकीमुळे काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी आता बड्या थकबाकीदारांकडे नजर वळविली आहे. त्याचा भाग म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांशी संबंधित येथील मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील आर्मस्ट्राँग साखर कारखान्यास 51 कोटीच्या थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने नोटीस बजावली आहे.
अवसायनात निघालेल दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना वित्तीय संस्थांची देणी फेडण्यासाठी कर्जवसुली प्राधिकरणासाठी 2010 मध्ये लिलावास काढला होता. मालेगाव शहराच्या हद्दीपासून 3 किलोमीटरवरील 289 एकर जमीन तसेच कारखाना अशी सर्व मालमत्ता भुजबळ यांच्याशी संबंधित कंंपनीने 27 कोटी 55 हजारांत खेरदी केला होता. हा कारखाना कवडीमोल भावाने विक्री झाल्याचा सूर व सभासद व कारखान्याच्या माजी कामगारांनी लावल्याने सुरूवातीपासूनच हा विक्री व्यवहार संशयाच्या भोवर्‍यात सापडला होता. गिरणा बचाव कृती समितीने त्याविरोधात वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत.
2012 मध्ये या कारखान्यास नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 30 कोटीचे कर्ज दिले होते. व्यवस्थापन बदलल्यानंतर प्रारंभी दोन ते तीन वर्षे हा कारखाना सुरू होता. नंतर तो पुन्हा बंद पडला. सुरूवातीला कारखाना व्यवस्थापनाने नियमितपणे जिल्हा बँक कर्ज हप्त्याची फेड केली. नंतर त्यात खंड पडला.
याच दरम्यान छगन भुजबळ यांच्याविरूद्ध मालमत्तेप्रकरणी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत भूखंडासह या कारखान्यावरही बंदी आदेश बजावण्यात आले होते. त्यानंतर बँक कर्जाची थकबाकी आणखी वाढत गेली. जवळपास 18 कोटींचे हप्‍ते कारखाना व्यवस्थापनाने फेडले होेते. त्यानंतर कर्जफेड थांबल्याने 12 कोटी थकी मुद्दल, त्यावरील व्याज अशी थकबाकीची एकूण रक्कम 51 कोटींवर पोहोचली आहे.
थकबाकी वसुलीसाठी आता बँक प्रशासन या कारखान्याविरूद्ध कारवाईच्या तयारीत आहे. कारखान्याचे संचालक माजी खा. समीर भुजबळ, माजी आ. पंकज भुजबळ, सत्यन केसरकर यांना वसुली संदर्भात बँकेतर्फे सरफेसी कायद्याच्या कलम 13(2) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. बँकेचे प्राधिकृत अधिकारी केशव निकम, गोरख जाधव यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळी तशी नोटीस चिकटवली आहे. (लोकसत्ता, 15.01.20214)