सोलापूर ः
जिल्ह्यात खासगी 23, सहकारी 13 कारखान्यांकडून ऊस गाळप होत आहे. आतापर्यंत 1 कोटी 15 लाख मे.टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. अद्यापही 40 लाख टन उसाचे गाळप बाकी आहे. त्यामुळे 20 मार्चपर्यंत साखर कारखाने चालणार आहेत. यंदाच्या वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे यंदा गाळप कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
धरण, नद्या, तलावांच्या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र असल्यामुळे जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंत चारणार असल्याचा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला आहे. ऊस क्षेत्र कमी झाल्यामुळे यंदाच्या वर्षी साखर कारखान्यांकडून दर चढाओढीने दिले आहेत. परंतु ऊसतोड टोळीचे प्रमाण यंदाच्या वर्षी कमी झाल्यामुळे अनेक शेतकर्यांना टोळी मिळाली नाही. त्यामुळे त्या शेतकर्यांनी कर्नाटकातील अनेक कारखान्यांना आपला ऊस दिला आहे. तर काही शेतकर्याचा ऊस जागेवरच वाळून गेला आहे. त्यामुळे उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, त्याचा मोठा फटका शेतकर्यांना बसला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 1 कोटी 15 लाख मे.टन मे.टन उसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यातील काही भागात ऊसतोड टोळी उशिराने मिळाल्याने तोडणी उशिराने सुरू झाली आहे. तर काही भागात ऊसतोड मशिन, टोळ्यांच्या माध्यमातून ऊस तोडण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के ऊस क्षेत्राचे गाळप झाले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित उसाचे गाळप होईल. - पांडुरंग साठे, प्रादेशिक उपसंचालक, साखर विभाग, सोलापूर (पुढारी, 07.02.2024)