anekant.news@gmail.com

9960806673

वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

जमीन, इमारती, अन्य प्रकल्पांचाही समावेश, 203 कोटींचे थकीत कर्ज प्रकरण
बीड ः दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी उभारणी केलेल्या व एकेकाळी सहकारात नावलौकिक असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने 203 कोटी 69 लाख रूपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सोमवार दि. 01 जानेवारी रोजी ई-लिलावाद्वारे विक्रीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. 25 जानेवारीला सकाळी 11 ते 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या छत्रपती संभाजीनगर येथील न्यू उस्मानपुरा शाखेचे 20 एप्रिल 2021 पासून थकीत असलेल्या 203 कोटी 69 लाख रूपयांचे कर्ज, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँंकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाने ही प्रक्रिया हाती घेतली आहे.
कारखान्याच्या कौठाळी व पांगरी येथील 67 हेक्टर शेतजमिनीसह याच दोन गावांतील 24 हेक्टर बिगरशेती जमिनीचा लिलाव बँकेने हाती घेतला आहे. यासह शुगर प्लांटची कारखाना इमारत, जुना नाव डिस्टीलरी प्लाँंट, बायोगॅस प्लाँट व मशिनरीचा लिलावाच्या नोटिशीत उल्लेख आहे. या शेतजमिनी व बिगर शेतजमिनी विविध 68 ठिकाणी आहेत. मशिनरी व प्लांँटची राखीव किंमत 62 कोटी 25 लाख रूपये तर जमीन व इमारतीची राखीव किेंमत 45 कोटी 86 लाख रूपये ठेवण्यात आली आहे.
यापूर्वी जीएसटी विभागाची कारवाई - गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 19 कोटींच्या थकीत जीएसटी प्रकरणह या विभागानेही कारखान्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. याचे राजकीय पडसाददेखील उमटले होते. या पार्श्‍वभूमीवर समर्थकांनी मदत देऊ केली होती. मात्र, पैसे नको, आशीर्वाद द्या, म्हणत पंकजा मुंडेंनी मदत नाकारली होती. दरम्यान, केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार विकास निगम लि.मार्फत राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोन दिले. यात वैद्यनाथचा या लोनसाठी प्रस्ताव असूनही लोन मिळाले नाही. याबाबत खुद्द पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
एकेकाळी होता सर्वत्र नावलौकिक - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. कारखान्याचा गाळपासह व्यवस्थापनात सर्वत्र नावलौकिक होता. पुढें पंकजा मुंडे कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या. दुष्काळामुळे ऊस उत्पादन घटल्याने कारखाना आर्थिक अडचणीत आला. अनेकदा कारखान्याचे गाळपही बंद राहिल्याने कर्जाची रक्कम वाढत गेली. कारखान्याचे कर्मचार्‍यांचे वेतन, पीएफ, उसाची एफआरपी रक्कम, कामगारांसह मुकादमांच्या आर्थिक देण्यांचे मुद्देही पुढे आलेले आहेत. विविध बँकांचे कारखान्याकडे कर्ज थकवलेलेे असून यंदाही कारखान्याचे गाळप बंद आहे. आता यातील युनियन बँकेने ही लिलाव प्रक्रिया हाती घेतली आहे. (सकाळ, 10.01.2024)