anekant.news@gmail.com

9960806673

ऊस दरात परत ‘गणदेवी’ अव्वल

उसाला प्रतिटन रू.3905 चा विक्रमी दर
देशातील साखर हंगाम अपेक्षापेक्षा जास्त उत्पादन घेऊन संपला आहे. दोन तीन राज्यात काही तुरळक ठिकाणी अद्याप गाळप सुरू आहे. “साखर उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर, उत्पादनात आघाडीवर, साखर उद्योगावर महाराष्ट्राची मक्तेदारी” अशा ठळक मथळ्याखाली बातम्या वाचनात येत आहे. याच बरोबर अनेक कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी जमा केल्याचेही कळत आहे. अनेक अडचणींना कसे सामोरे जात किती मुश्कीलीने एफआरपी देण्यात आली याबद्दल साखर कारखान्यांच्या वतीने शेतकर्‍यांना भावनीक आवाहन होताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील साखर उद्योगातील सर्वात नाजूक विषय म्हणजे “ऊस दर.” इथे तालुका निहाय, जिल्हा निहाय कारखान्यांनी किती वाढीव दर दिला, त्याबद्दल कौतुक होते. पण महाराष्ट्रातील एकाही साखर कारखान्याने देश पातळीवर सर्वोच्च ऊस दर जाहीर केला किंवा शेतकर्‍यांना दिला असे कधी घडले नाही. उसाला उच्चांकी दर देण्याची मक्तेदारी फक्त गुजरातच्या गणदेवी कारखान्याने घेतली आहे का? असे वाटतेे. दरवर्षीची गणदेवीची विक्रमी दर देण्याची त्यांनीच परंपरा यावर्षीही गणदेवी कारखान्याने जपली आहे. यावर्षीच्या उसाला त्यांनी तब्बल 3905/- रूपये प्रतिटन ऊस दर अदा केली आहे.

गणदेवी साखर कारखाना इतका उच्चांकी दर कसा देऊ शकतो याबद्दल दरवर्षी चर्चा केली जाते. महाराष्ट्रातून अनेक उच्च पदस्त मंडळी गणदेवीला भेटही देतात. पण नेहमीप्रमाणे त्यांचे अनुकरण मात्र करत नाहीत. महाराष्ट्रातील साखर उतारा जितका आहे तितकाच उतारा गुजरातमध्ये ही आहे. साखरेला मिळणारे दरही जवळपास तसेच आहेत. तरीसुद्धा गणदेवी कारखान्याला इतका उच्चांकी दर द्यायला परवडते, तर महाराष्ट्रातील सधन ऊस भागातील कारखान्यांना का ? जमत नाही, असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगातील सर्वांना गुजरात पॅटर्नबद्दल माहिती आहे. गुजरातमधील कारखाने आपल्या शेतकरी सभासदांना इतका ऊस दर कसा उपलब्ध करून देतो याबद्दल अनेकवेळा चर्चा उच्च पातळीवर घडलेल्या आहेत. सरतेशेवटी चर्चेवरतीच सर्व निपटते. पुढे जाऊन काहीही होत नाही. गणदेवी एवढे ऊस दर देणे खरच इतके अशक्यप्राय आहे का? गणदेवी कारखान्याने अनेक वेळा त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल योग्य ते विश्‍लेषण नेहमी केले आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योग कुठे कमी पडते, याबद्दल जाहीरपणे मांडणी केलेली आहे. यामध्ये मुख्यतः व्यवस्थापन, नियोजन, समन्वय, नियंत्रण, मागदर्शन व संघटन हे महत्त्वाचे विषयी सांगितले आहे. अनावश्यक गुंतवणूक टाळणे, तसेच साखर उद्योगाचा सखोल अभ्यास करत देशातील आणि आंतरराष्ट्रीय साखरेच्या घडामोडीवर लक्ष ठेवून त्याप्रमाणे योग्य नियेाजन करून साखरेची विक्री करता येते व त्यातून शेतकर्‍यांना उच्चांकी दर देता येते हे गणदेवीने सर्वांना दाखवून दिले आहे. त्यांनी मापदंड अनुसरले आहे तेच महाराष्ट्रातील कारखान्यांनी अंगीकारले तर इतका उच्चांकी दर त्यांना शक्य होणार आहे, यात शंका नाही.
साप्‍ताहिक साखर डायरीचे संपादक मा. कै. अजित नरदे यांनी वेळोवेळी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनीही एक रकमी उचल याची मागणी करण्यापेक्षा छोटी उचल आणि मोठा अंतिम दर पद्धत स्विकारण्याची सूचना अनेक शेतकरी संघटनेच्या स्थानिक नेत्यांनी सुचविले होते. पण एक रकमी उचल हेच ध्येय ठेवून आंदोलन केल्याने शेतकर्‍यांना अधिक मिळणार्‍या ऊस दराचा फायदा घेता आला नाही हे त्यांचे दुर्दैव आहे.

गणदेवी चा 2023-24 सारासार

चालू हंगामात कारखान्याने ऊसतोडणी व वाहतूक 770/- रूपये वगळून उसाला उच्चांकी 3905/- रूपये इतका दर दिला.
यावर्षी कारखान्याने 9 लाख 14 हजार 499 मे.टन गाळप केेले असून 10 लाख 48 हजार 330 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा हा 11.53 टक्के इतका आहे.

या कारखान्याने यंदाच्या हंगामात ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत तोडणी व वाहतूक व्यतिरिक्त 3605/- रूपये दर दिला. तसेच फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमध्ये गाळपास आलेल्या उसाला अनुक्रमे 3705/-, 3805/- व 3905/- रूपये दर शेतकर्‍यांना दिला आहे.