शिंदे कारखान्याच्या दोन्ही युनिटचे 4 कोटी रूपये 2-3 दिवसांत खात्यात जमा होणार
टेंभूर्णी ः विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं. 1 पिंपळनेर व युनिट नं. 2 करकंब या कारखान्यानं सन 2023-24 गळीत हंगामामध्ये जळीत होवून गाळपास आलेल्या उसाचे बिलातून कारखाना धोरणानुसार कपात केलेली संपूर्ण रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकर्यांना परत करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, की विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं.1 व युनिट नं. 2 येथील 2023-24 चा गळीत हंगाम नुकताच बंद झालेला आहे. या गळीत हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे दि. 1/11/2023 ते दि. 6/04/2024 या कालावधीत ज्या ऊस पुरवठादारांचा ऊस शॉर्टसर्किट, नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे जळीत होवून गळीतास आला आहे त्यांचे ऊस बिलातून कारखाना धोरणाप्रमाणे प्रतिटन रक्कम कपात करण्यात आली आहे. सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून शेतकर्यांना पिण्याचे पाणी, जनावरांचे चार्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे. शेतकरी अनेक आर्थिक अडचणींना तोंड देत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने ऊस बिलातून कपात करण्यात आलेली जळीताची 100 टक्के रक्कम ऊसस पुरवठादारांना परत करण्यात येणार आहे.
जळीत उसाची कपात रक्कम सभासद शेतकर्यांना परत मिळाल्याने त्यांना दिलासा मिळार आहे. जळीत कपात रक्कमेमध्ये युनिट नं. 1 पिंपळनेर येथील रूपये 3 कोटी 94 हजार व युनिट नं. 2 करकंब येथील रूपये 90 लाख 29 हजार अशी एकूण 3 कोटी 91 लाख रक्कमेचा समावेश आहे. सदर जळीत उसाची कपात रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात येत्या 2-4 दिवसात वर्ग करण्यात येणार आहे.
कारखाना व्यवस्थापनाने सातत्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतकर्यांचे हित जोपासणेचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही युनिटकडील सन 2023-24 चा गळीत हंगामातील गाळपाचे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतकर्यांनी सहकार्य केले असून पुढील सन 2024-25 गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊस नेांदी कारखान्याकडे द्यावेत असे आवाहन अध्यक्ष आ. शिंदे यांनी केले. (एकमत, 21.04.2024)