anekant.news@gmail.com

9960806673

साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 लाख टनांनी घटले

देशात नोव्हेंबरअखेर 43 लाख टन साखर तयार
कोल्हापूर ः देशात नोव्हेंबरअखेर 43 लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत 5 लाख टनांनी साखर निर्मिती कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्र व कर्नाटकातील कमी साखर उत्पादनामुळे देशातील साखर उत्पादन पिछाडले. देशात सुरू असणारे कारखाने, उसाचे गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा, या सर्वच बाबी गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत. यंदा देशात 433 कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. गेल्या वेळी 451 कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता.
देशाचा यंदाचा साखर हंगाम ऑक्टोबरला सुरू झाला. या महिन्यात केवळ उत्तर प्रदेशातील साखर कारखाने सुरू झाले. महाराष्ट्र व कर्नाटकचा हंगाम नोव्हेंबरला सुरू झाला. महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असल्याने महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साखरनिर्मिती सुरू झाली. या कालावधीत केवळ उत्तर प्रदेशातच साखरनिर्मीती सुरू राहिली. सुरूवातीला उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली. परंतु नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून महाराष्ट्रातही वेगात हंगाम सुरू झाल्याने या राज्याचे उत्पादनही वाढले.
उत्तर प्रदेशात 110 साखर कारखान्यांनी 144 लाख टन ऊस गाळप करून 13 लाख टन साखर तयार केली आहे. या राज्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक 6 साखर कारखाने सुरू झाले. गेल्या वर्षी या कालावधीत 10 लाख टन साखर तयार झाली होती. महाराष्ट्रात 172 साखर कारखान्यांनी 171 लाख टन उसाचे गाळप करून 13.50 लाख टन साखर तयार केली. महाराष्ट्र केवळ 50 हजार टनांनी साखर निर्मितीत पुढे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या राज्यात तब्बल 7 लाख टनांनी साखर उत्पादन घटल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचा साखर उताराही गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 टक्क्यांनी घटला आहे. कर्नाटकात 73 कारखान्यांनी साखर हंगाम सुरू केला. कर्नाटकात 129 लाख टन उसाचे गाळप होऊन 11 लाख टन साखर तयार झाली.
देशातील साखर निर्मितीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक या पहिल्या 3 राज्यांनी एकूण गाळपाच्या 86 टक्के गाळप केले. तर 87 टक्के साखरेचे उत्पादन केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखाने सुरू होण्याची टक्केवारी 4 टक्क्यांनी कमी आहे. गाळप 10 टक्क्यांनी घटले आहे. साखर उत्पादनही 11 टक्क्यांनी कमी आहे. साखर उतार्‍यातही 0.25 टक्क्याची घट आहे. उत्तर प्रदेश व कर्नाटकचा साखर उतारा महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. (अ‍ॅग्रोवन, 18.12.2023)