उसाचे क्षेत्र 6 हजार हेक्टर ः पाण्याअभावी ऊस वाळला
उमदी ः जत तालुक्यातील उमदी, उटगी, पूर्व भागात यंदा उसाचे 6 हजार हेक्टर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन निम्म्यावर आले आहे. पावसाने दडी मारल्याने उसाची वाढ खुंटली आहे. पाण्याअभावी ऊस वाळला आहे. जत तालुक्यातील दोन व तालुका सीमेलगत असलेले भैरवनाथ शुगर-लवंगी तसेच अवताडे शुगर-मंगळवेढा व कर्नाटक हद्दीतील दत्त इंडिया शुगर असे 5 कारखाने उसावर अवलंबुन आहेत. मात्र तोडीसाठी टोळ्या मिळत नसल्याने ऊस वेळेवर जात नाही. ऊस उत्पादक शेतकर्यांतून त्यामुळे ओरड सुरू आहे.
गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उसाची वाढ न होता ऊस खुंटला आहे. वजनात 40 टक्के घट झाली आहे. उतारा प्रतिहेक्टरी कमी मिळत आहे. उमदी, संख भिवरगी, करजगी, अंकलगी, आदि परिसरात 6 ते 7 हजार हेक्टर ऊस असून तो गाळपासाठी उपलब्ध आहे. हा ऊस उचलण्यासाठी जत येथील राजारामबापू व डफळापूर येथील श्रीपतराव कदम तसेच सीमाभागात असलेले भैरवनाथ शुगर, दत्त इंडिया-चडचण आदी कारखान्यांसह सीमाभागातील ऊस नेला जात आहे. (सकाळ, 01.01.2024)