जयसिंगपूर ः भारतीय साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची यावर्षीच्या भारतीय शुगरच्या राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शनिवार दि. 10 फेब्रुवारी रोजी भारतीय शुगरद्वारे सयाजी हॉटेल, जुना पुणे बेंगलोर हायवे, कावळे नाका कोल्हापूर येथे आयोजित भारतीय शुगर सिम्पोझियमच वार्षिक पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार हा भारतीय साखरचा सुवर्ण इतिहास ठरेल, अशी माहिती भारतीय शुगर या संस्थेचे चेअरमन विक्रमसिंह शिंंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सहकार उद्योगाचे शिल्पकार, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून सन 1975 साली भारतीय शुगर या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या स्थापने मागणचा उद्देश हा सहकारी साखर कारखानदारीत येणारे नवनवीन तंत्रज्ञान कारखान्यांपर्यंत पोहोचावे व या तंत्रज्ञानाची माहिती कारखानदारीतील प्रगत मनुष्यबळाला अवगत व्हावी असा होता. या संस्थेच्या वतीने दरवर्षी वार्षिक प्रदर्शन व परिषद आयोजित करून साखर कारखानदारमध्ये भरीव योगदार देणार्या व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार देऊन गौरविले जाते.
उद्यानपंडित आणि क्षारपड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीमध्ये आपले भरीव असे योगदान देत असताना शेतकर्यांना कमी खर्चात जास्तीचे उत्पादन घेता येण्यासाठी राबवलेली ऊस विकास योजना, सुपर केंन नर्सरी तंत्रज्ञान, एकरी 100 टनांचे ऊस उत्पादन घेण्याचे तंत्र, दिवसेंदिवस शेतकर्यांच्या जमिनीचा पोत सुधारावा या हेतूने सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न व शिरोळ तालुका आणि परिसरात सुमारे साडे आठ हजार एकरावर असणारे क्षारपड जमीन सुधारावे यासाठी हाती घेतलेले क्षारपड मुक्त जमीन अभियानाचे दत्त पॅटर्न तसेच साखर कारखानदारीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबविण्यासाठी केलेले काम, या सर्व बाबींची दखल घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. (महासत्ता, 09.02.2024)