anekant.news@gmail.com

9960806673

देशात एकूण 1380 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती

त्यापैकी 875 कोटी लिटर उसाच्या मळीपासून तर , 505 कोटी लिटर इथेनॉल धान्यापासून निर्मिती
नवी दिल्ली ः 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत देशात सुमारे 1380 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे. त्यापैकी 875 कोटी लिटर इथेनॉल मोलॅसिस म्हणजे उसाच्या मळीपासून तर 505 लिटर धान्यापाासून तयार करण्यात आले आहे.
केंद्र सरकार देशभरात इथेनॉल मिश्रीत पेट्रोल (ई.बी.पी.) योजना राबवत आहे. ज्याअंतर्गत तेल विपणन कंपन्या इथेनॉल मिश्रीत पेट्रोलची विक्री करतात. या कार्यक्रमांतर्गत सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सुमारे 1016 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. तर इतर वापरासाठी एकूण 1350 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. यासाठी कोणत्याही संयंत्राची कार्यक्षमता 80 टक्के असे गृहीत धरून 2025 पर्यंत 1700 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती क्षमता असणे आवश्यक आहे.
नवीन इथेनॉल कारखान्यांच्या स्थापनेमुळे तसेच विद्यमान इथेनॉल कारखान्यांचा विस्तार केल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात 40 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
इथेनॉलच्या विक्रीद्वारे साखर कारखान्यांत रोख रकमेचा ओघ वाढण्यास मदत झाली आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पैसे त्वरित देण्यात आले आहेत. साखर कारखान्यांनी साखर हंगाम 2022-23 मध्ये शेतकर्‍यांच्या उसाच्या थकबाकीपैकी 98.3 टक्के आणि 2021-22 च्या हंगामातील उसाच्या थकबाकीपैकी 99.9 टक्के रक्कम दिली आहे.
गेल्या 10 वर्षात साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या विक्रीतून 94 हजार कोटी रूपयांहून अधिक महसूल मिळवला आहे, ज्यामुळे साखर कारखान्यांच्या गंगाजळीतही भर पडली आहे.
इथेनॉन निर्मितीमुळे, पेट्रोल किंवा कच्च्या तेलाच्या आयातीत घट झाली असून, त्यामुळे देशाच्या परदेशी चलनाची बचत झाली आहे. 2022-23 मध्े सुमारे 50 कोटी लिटर इथेनॉलच्या उत्पादनासह भारताने सुमारे 24,300 कोटी रूपयांच्या परदेशी चलनाची बचत झाली आहे आणि भारताच्या सुरक्षेतही सुधारणा झाली आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. (प्रेसनोट, 30.12.2023)