anekant.news@gmail.com

9960806673

ऊस लागवड घसरल्याने गाळपाचे दिवसही घटणार

खोडवा, निडव्याशिवाय नाही पर्याय ः डीएसटीएचे चर्चासत्र
पुणे ः अपेक्षित पाऊस नसल्यामुळे राज्याच्या ऊस लागवडीत सलग दोन वर्षांपासून घसरण होत आहे. त्यामुळ पुढील गाळप हंगामात ऊस उपलब्धता लक्षणीय प्रमाणात घटू शकते. परिणामी पुढील गाळप हंगाम केेवळ 70-80 दिवसांचा राहू शकतो, अशी भीती डीएसटीएच्या राज्यस्तीरय चर्चासत्रात करण्यात आली.
दुष्काळामुळे घटलेल्या ऊस लागवडीमुळे खोडवा, निडव्याचे नियोजन या विषयावर शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी डीएसटीच्या मुख्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. डीएसटीए, साखर संघ व विस्माने आयोजिलेल्या या चर्चासत्राला खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. माजी कुलगुरू डॉ. वाय.एस. नेरकर, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार, डीएसटीएचे मानस सचिव एम.आर. कुलकर्णी व कार्यकारी सचिव गौरी पवार उपस्थित होते.
खताळ म्हणाले, चालू हंगामापेक्षाही पुढील हंगामातील ऊस उपलब्धता घटू शकते. दुष्काळी स्थिती बघता ऊस पिकाचे उत्पादन व उत्पादकतेवर यंदा प्रश्‍नचिन्ह आहे. पुढील वर्षी राज्याचे ऊस उत्पादन 600-650 लाख टनापर्यंत घसरल्यास गाळप हंगाम 70 दिवसांपेक्षा जास्त चालू शकणार नाही. शेततळ्यांचा वापर करण्याविषयी टीका होत असली, तरी आता ऊस शेतीसाठी तळ्यांचा वापर करायला हवा. ठिबक, तुषार व इतर तंत्र वापरून उत्पादकता टिकवावी लागेल. खोडवे, निडवे ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना विश्‍वासात घ्यायला हवे.
डॉ. पवार म्हणाले, पाच दुष्काळी हंगामाचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक दुष्काळात खोडव्यानेच साखर उद्योगाला तारले आहे. यंदा ऊस उत्पादकता हेक्टरी 90 टनांपेक्षाही खाली जाईल व साखर कारखाने 100 दिवसांच्या आसपास चालतील. मात्र अवर्षण स्थितीमुळे पुढील हंगामात उसाची अतिटंचाई तयार होईल.
दरम्यान, पुढील हंगामात ऊस बेण्याची कमतरता भासू शकते, असा इशारा डॉ. नेरकर यांनी दिला. उसामुळे साखर उद्योग उभा राहिला. त्यामुळे ग्रामीण भागात सामाजिक, आथिर्र्क व आरोग्यविषयक क्रांती घडून आलेली आहे. मात्र पुढील हंगामात ऊस उपलब्धता घटून ही क्रांती शांत होण्याची भीती आहे. त्यासाठी सर्व साखर कारखान्यांना दक्ष राहून युपढे खोडवा, निडव्याच्या व्यवस्थापनाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागेल. (अ‍ॅग्रोवन, 17.12.2023)