anekant.news@gmail.com

9960806673

ब्राझीलची साखर निर्यात 28 टक्क्यांनी वाढली

कोल्हापूर ः यंदाच्या हंगामात जगामध्ये ब्राझीलच्या साखरेचा दबदबा राहणार हे स्पष्ट होत आहे. साखर निर्यातीत ऑक्टोबरच्या तुलनेेत नोव्हेंबरमध्ये 28 टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात साखरेची निर्यात 30 लाख टनापर्यंत जाऊन पोहोचली. ऑक्टोबर 2022 नंतर ही झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात झाली आहे. अजूनही निर्यात वाढण्याची शक्यता आहे.
इतर देशातील घटत्या उत्पादनामुळे ब्राझीलला मोठा लाभ मिळणार असल्याची शक्यता आहे. ब्राझीलच्या सरकारी एजन्सी कोनबॅने दिलेल्या माहितीनुसार, अनुकूल हवामानामुळे उसाचे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. परिणामी, जगातील आघाडीचा साखर निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब्राझीलच्या साखर उत्पादनात 27.4 टक्क वाढ होऊन 460 लाख टनांचा ऐतिहासिक उच्चांक गाठ्याची शक्यता आहे.
सध्या भारतासारख्या देशांमध्ये साखर उत्पादनावरून साखर उद्योग व केंद्र सरकार यांच्यात घमासान सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी साखर निर्यातीत एक नंबरवर असलेल्या भारताची यंदा जगाच्या बाजारपेठेत एकदम केवीलवाणी अवस्था झाली आहे. एकदम उच्चांकी निर्यातीनंतर ते निर्यात बंद असा दोन वर्षाचा भारताचा प्रवास झाला आहे.
यंदा जगाच्या बाजारपेठेत भारताची साखर येणार नाही हे निश्‍चित झाले आहे. भारताची सर्व धोरणे ब्राझीलच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. 2021-22 ला 100 लाखांहून अधिक तर 2022-23 मध्ये 60 लाख टन साखर निर्यात झाली. भारताजवळील देशांना या निर्यातीचा फायदा झाला.
ब्राझीलपासून गेल्या दोन वर्षात दुरावलेल्या देशांना यंदा केवळ ब्राझीलशिवाय पर्याय उरला नाही. याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. तेथील बंदरावर साखर वाहतुकीसाठी जहाजे मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या जागतिक बाजारात साखर दरात तेजी मंदी सुरू आहे. यामुळे जेवढी साखर चांगल्या दराने बाहेर जाईल तितकी साखर बाहेर काढण्याचा प्रयत्न ब्राझीलचा साखर उद्योग करत असल्याचे चित्र आहे.
ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन गेल्या सहा महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढले आहे. युनिका या संस्थेने ही माहिती दिली. ब्राझीलचा हंगाम आता अंतिम टप्प्यात येत असून अंंतिम टप्प्यातही साखरेची उत्पादन वाढ कायम आहे. (अ‍ॅग्रोवन, 15.12.2023)