साखर उतार्यात वाढ झाल्याने ऊस उत्पादकांसह साखर कारखानदारांना दिलासा
पुणे ः गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पदनावर विपरीत परिणाम झाला. परिणाम गाळप हंगामाच्या सुरूवातीला साखर उतार्यात मोठी घट दिसून आली. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखर उतारा गेल्या वर्षी इतकाच अर्थात 9.83 टक्के मिळाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 790 लाख टन ऊस गाळपापासून 77.6 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतार्यात वाढ होत असल्याने कारखानदारांना व शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. यंदाचा गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंत चालेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी राज्यात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने साखर उत्पादक जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे ऊस लागवड लांबली, तर यंदाच्या पावसाळ्यात पाऊसमान कमी झाल्याने उसाच्या वाढीवरही विपरीत परिणाम झाला. याचा थेट फटका साखर उतार्यावर दिसून आला.
यंदा 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेला गाळप हंगाम सुरूवातीला साखर उतारा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होता. त्यामुळे साखर उत्पादन घटेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत राज्यात 9.83 टक्के साखर उतारा मिळाला आहे. साखर उतारा वाढल्याने साखरेचे उत्पादन देखील वाढण्याची अपेक्षा साखर कारखानदारीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्य वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्याने साखर हंगाम कमी काळ चालेल अशी अपेक्षा होती. ऊस उत्पादनाचा अंदाज घेता मार्च अखेरपर्यंत गाळप हंगाम सुरू राहील. - अनिल कवडे, साखर आयुक्त (लोकमत, 15.02.2024)