anekant.news@gmail.com

9960806673

आठ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवू द्या

विस्माचे केंद्र सरकारला पत्र
पुणे ः राज्यात उपलब्ध असलेल्या जादा उसामुळे यंदा 8 लाख टनांपर्यंत अतिरिक्त साखर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.
आत्मनिर्भर राष्ट्रीय इथेनॉल मिश्रण कार्यक्रम राबवताना केंद्रोन डिसेंबर 2023 पूर्वीच्या धोरणानुसार निर्णय घ्यावेत, अशी स्पष्ट मागणी करणारे एक पत्र विस्माने केंद्राला पाठवले आहे. विस्माचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांना पाठवलेल्या एका पत्रात ही मागणी केली आहे.
इथेनॉल मिश्रण कार्यक्रम आधीच्या धोरणाप्रमाणे व्यवस्थित राबवला जात होता. परंतु 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्राने एक वेगळा आदेश काढला. त्यानुसार सिरपपासून इथेनॉल तयार करण्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे इथेनॉलकडे साखर वळवणे थांबले आहे. यामुळे इथेनॉल मिश्रण कार्यक्रम धोक्यात आल्याचे साखर उद्योगाला वाटते आहे.
महाराष्ट्रात यंदा साखर उत्पादन कमी होईल, असा केंद्राचा आधीचा अंदाज होता. त्यामुळेच इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणलेले आहेत. निर्बंध पुन्हा रद्द करण्यासाठी या पत्रात काही मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सध्या उभ्या असलेल्या उसाचा अंदाज घेतला असता ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मध्य, मराठवाडा, विदर्भातील ऊस उत्पादकता वाढलेली आहे. सुक्रोजचे प्रमाण वाढून 10 ते 12 टक्क्यांपर्यंत गेले आहे.
राज्याच्या साखर उत्पादनात 7.5 टक्के वाढ होऊन ते 85 लाख टनाऐवजी 95 लाख टनांपर्यंत जाईल, असे या पत्रात म्हटले आहे. आता 95 लाख टनांपर्यंंत साखर उत्पादित होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरणारी 7 ते 8 लाख टन साखर बी हेव्ही मळीच्या माध्यमातूून इथेनॉलकडे वळविणे शक्य आहे, असे विस्माचे म्हणणे आहे. (अ‍ॅग्रोवन, 05.01.2024)