प्रतिटन 4200 रूपयांची मागणी, अन्यथा कारखानदारी उद्ध्वस्त होण्याची भीती
कोल्हापूर ः केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत प्रतिक्विंटल 25 रूपये वाढ करून तो 340 रूपये केला आहे. यामुळे ऊस उत्पादकांना 3400 रूपये प्रतिटन द्यावे लागणार आहेत. साखरेला चांगला दर मिळाला तरच हा दर देणे कारखानदारांना शक्य होणार आहे. यासाठी साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल 420 रूपये करावा अन्यथा साखर उद्योग उद्ध्वस्त होण्याची भीती साखर उद्योगातून होत आहे.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार एफआरपीत होणार्या वाढीच्या आधारावर साखरेचाा किमान विक्री दर तसेच इथेनॉलचा खरेदी दर वाढविण्याचे सूत्र ठरले होते. मात्र गेल्या 5 वर्षात एफआरपी प्रतिटन 2200 रूपयांवरून 3400 रूपयांवर गेली आहे. साखरेचा किमान विक्री दर 2019 मध्ये 2900 रूपयांवरून 3100 रूपये प्रतिक्विंटल करण्यात आला. त्यानंतर गेल्या 5 वर्षात त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.
ऊस लागणीच्या वेळेस एफआरपी जाहीर करण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे. यामुळे शेतकर्यांना ऊस लावायचा की अन्य पिकांकडे वळायचे याचा निर्णय घेता येईल. मात्र याचवेळी साखरेचा किमान विक्री दर, इथेनॉलचा खरेदी दरही वाढवणे आवश्यक आहे. - प्रफुल्ल विठलानी, अध्यक्ष, ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (लोकमत, 23.02.2024)