84 लाख टन उसाचे गाळप ः मार्चअखेर हंगाम संपण्याची शक्यता
सांगली ः जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. 6 कारखान्यांचा गाळप हंगाम सध्या आटोपला आहे. 16 साखर कारखान्यांनी 84 लाख 50 हजार टन उसाचे गाळप करून 94 लाख 49 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्यांचा सरासरी 11.18 टक्के उतारा गळीत हंगामात मिळाला आहे. मार्चच्या अखेरपर्यंत हंगाम संपण्याची शक्यता कारखानदारांनी वर्तवली आहे.
जिल्ह्यात यंदा 16 साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. हंगामात 1 लाख 35 हजार 688 हेक्टरवरील उसाचे गाळपासाठी 15 साखर कारखाने सुरू झाले ऊस दराचा प्रश्न आणि अवकाळी पाऊस यामुळे गाळप हंगामास गती आली नव्हती. त्यानंतर गाळप सु रू झाले असले तरी, दराचा प्रश्न सुटला नसल्याने कारखानदारांनी आंदोलनाची दाहकता लक्षात घेऊन गाळप सुरू ठेवले होते. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तासगाव येथील एस.जी.झेड कारखान्याने गाळप सुरू केल्याने गाळप करणार्या कारखान्यांची संख्या 16 झाली.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात राजारामबापूचे जत व आरगचा मोहनराव शिंदे या कारखान्यांचा हंगाम आटोपला होता. त्यानंतर राजारामबापूचे वाटेगाव, कारंदवाडी, शिराळ्याचा दालमिया (निनाईदेवी), श्रीपती शुगर या 4 कारखान्यांची धुराडी थंडावली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात 78 लाख टन उसाचे गाळप करत 86 लाख 12 हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले. तिसर्या आठवड्यात 84 लाख 50 हजार टन गाळप करत 94 लाख 49 हजार क्विंटल उत्पादन झाले. (अॅग्रोवन, 19.03.2024)