anekant.news@gmail.com

9960806673

राज्यातील साखर उतारा एक टक्क्याने घटला

सव्वा महिन्यात राज्यात 16 लाख टन साखर उत्पादन
पुणे ः साखर हंगामाला सव्वा महिना उलटला असून 180 कारखान्यांनी आतापर्यंत 16 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उतार्‍यात सुमारे एक टक्क्याने घट झाली. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
1 नोव्हेंबरला ऊस गाळपाचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यानंतर दिवाळीमुळे गाळप उशिरा सुरू झाले. कोल्हापूर, सांगलीत शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कारखाने उशिरा सुरू झाले. राज्यात 88 सहकारी व 92 खासगी असे एकूण 180 साखर कारखाने गाळप करत आहेत. कोल्हापूर विभागात 21 सहकारी व 11 खासगी असे एकूण 32 तर पुणे विभागात 16 सहकारी व 11 खासगी असे 27 कारखाने गाळप करीत आहेत.
सोलापूर विभागामध्ये 15 सहकारी व 29 खासगी असे 44 कारखाने, नगर विभागात 14 सहकारी व 10 खासगी असे 24, औरंगाबाद विभागामध्ये 13 सहकारी 9 खासगी असे 22, नांदेड विभागात 9 सहकारी व 19 खासगी असे 28 तर अमरावती विभागात 2 व नागपुरात 1 खासगी कारखाना गाळप हंगामात सहभागी झाला आहे.
पावसाने ओढ दिल्याने ऊस वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच साखर उतारा कमी मिळाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. याचा परिणाम लागवडीवर देखील झाला असून, गाळप हंगाम यंदा आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील, अशी शक्यताही कारखानदार व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी याच काळात राज्यात 192 साखर कारखाने सुरू होते. त्यातून 278 लाख टन उसाचे गाळप होऊन 24 लाख टन साखर उत्पादित झाली होती. (लोकमत, 08.12.2023)