anekant.news@gmail.com

9960806673

राजगडचे कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

कामगाज स्थगित करारावर सह्यांना नकार

नसरापूर ः राजगड साखर कारखान्याने यंदा कारखाना बंद ठेवत कामकाज स्थगतीची नोटीस गेटवर लावली आहे. मात्र कामगारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कामकाज स्थगिती करारावर सह्या करण्यास नकार दिला असून, कामकाज स्थगितीची नोटीस मागे घेऊन कामगाराचा 25 महिन्यांचे वेतन व थकित देय ताबडतोब द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
कारखाना व्यवस्थापनाने मंगळवार दि. 13 पासून यंदाचा हंगाम बंदबाबत नोटीस कारखाना गेटवर लावली आहे. या विरोधात कामगार संघटनेच्या सूचनेनुसार अनेक कामगारांनी कार्यकारी संचालकांच्या नावे निवेदनात दिले आहे. याबाबत ही कामकाज बंदी बेकायदा असल्याचे कामगार संघटनेने म्हटले असून व्यवस्थापनाने कायम व हंगामी अशा सर्व कामगारांचे 25 महिन्यांचे सुमारे 5 कोटी 97 लाख 60 हजार 639 रूपये थकित ठेवले असून देय वेतनातून कपात घेतलेल्या रकमाही संंबंधित संस्था व सहकारी कार्यालयात जमा केल्या नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र राजशिर्के, संदीप सोनवणे, सुनील मारणे आदी कामगारांनी कामगार संघटनेची बाजू मांडताना कारखाना व्यवस्थापनाने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर भोर तहसील कचेरीसमोर उपोषणास बसण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे अध्यक्ष आ.संग्राम थोपटे यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत कामगारांबरोबर बैठक घेणार असून योग्य मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (अ‍ॅग्रोवन, 19.02.2024)