विदर्भात ऊस लागवड वाढीसाठी होणार काम
अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट (पुणे) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऊस पिकासाठी अनुकूल हवामान, जमीन आणि सिंचनाची व्यवस्था आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढीसाठी वाव आहे. हे लक्षात घेता आता शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातून विकास करण्यात येणार आहे.
या करारांतर्गत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधनपर प्रयोग, शेतकर्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे उपलब्ध आधुनिक प्रयोग शाळेमध्ये कार्य करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासह विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये तथा प्रक्षेत्रावर ऊस पिकावर संशोधन करण्यात येणार आहे. ऊस पिकामधील प्रक्रिया आणि निर्यातक्षक उत्पादने तयार करण्यासाठी विविध कौशल्य आधारित अभ्यासक्रमाद्वारे उद्यमशीलता निर्माण करण्यासाठी प्रयत्नसुद्धा करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला. (अॅग्रोवन, 25.02.2024)