anekant.news@gmail.com

9960806673

इथेनॉल देशात मार्चअखेर मिश्रण पोहोचले 12 टक्क्यांपर्यंत

कोल्हापूर ः केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंधन घातल्याने मागणी इतका पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. देशात मार्च अखेरपर्यंत इथेनॉलचे मिश्रण 11.96 टक्के वाढलेे आहे. कमी उत्पादन होऊनही तेल उत्पादक कंपन्यांनी आपल्या शिल्लक साठ्यातील इथेनॉल मिश्रणासाठी वापरले. त्यामुळे 2023-24 मार्च अखेरपर्यंत 232 कोटी लिटर इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये झाले.

इथेनॉल वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यात विविध उद्योगांकडून 224 कोटी लिटर इथेनॉलची प्राप्‍ती तेल कंपन्यांना झाली. तर मिश्रण 232 कोटी लिटरचे झाले. मिळालेल्या इथेनॉलपेक्षा 8 कोटी लिटर जादा मिश्रण झाले. याचाच अर्थ तेल कंपन्यांनी आपल्या शिल्लक साठ्यातूनही इथेनॉलचा वापर मिश्रणासाठी केला.

मोलॅसिस आधारित इथेनॉल प्रकल्पाकडून इथेनॉलची मागणी 152 कोटी लिटरची होती. या मागणीच्या तुलनेत 126 कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना उपलब्ध झाले. उसाच्या रसापासून 54 कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध हाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पहिल्या 5 महिन्यात 52 कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना उपलब्ध झाले. बी हेेवी मोलॅसिस आणि सी हेवी मोलॅसिसमधून अनुक्रमे 75 व 23 कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात अनुक्रमे 63 आणि 10 कोटी लिटर इथेनॉल या घटकांपासून तेल कंपन्यांना पुरविण्यात आले.

धान्य आधारित उद्योगाकडून इथेनॉलची मागणी 168 कोटी लिटरची होती. प्रत्यक्षात धान्य उद्योगाकडून 98 कोटी लिटर इथेनॉलची उपलब्धता झाली. खराब धान्यापासून 86 कोटी इथेनॉल उपलब्ध होईल, असा अंदाज होता. यापैकी 47 कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध झाले.

केंद्राच्या बंधनाचा नकारात्मक परिणाम - साखर उद्योग व धान्य उद्योगातून एकत्रित इथेनॉल 320 कोटी लिटर मिळेल, असा अंदाज होता. या तुलनेत 224 कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना दोन्ही उद्योगाकडून मिळाले. केंद्राने साखर उद्योगातील इथेनॉल निर्मितीवर बंधन आणले. तसेच इथेनॉल निर्मितीसाठी अनुदानित तांदळाच्या वापरावरही बंदी घातली आहे. दोन्ही गोष्टींचा नकारात्मक परिणाम जलद गतीने इथेनॉल निर्मिती होण्यावर झाला. त्यामुळेच मागणीच्या तुलनेत पुरेसे इथेनॉल तेल कंपन्यांना मिळू शकले नाही. (अ‍ॅग्रोवन, 28.04.2024)