टेंभूर्णी ः विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं. 1 पिंपळनेर व युनिट नं. 2 करकंब कारखान्याकडे 16 ते 31 जानेवारी दरम्यान गळीतास आलेल्या उसाचे अनुदानासह प्रतिटन 2750 रूपये ऊस बिल शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून 15 जानेवारीअखेर ऊसतोडणी वाहतूक बिले वाहनमालकांच्या खात्यावर जमा करणेत आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बबनराव शिंदे यांनी दिली.
अध्यक्ष शिंदे म्हणाले, की विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं.1 व युनिट नं.2 येथील 2023-24 चा गाळप हंगाम सुरू असून नं. 1 येथे आजअखेर 11 लाख 83 हजार 87 मे.टन व युनिट नं.2 येथे 4 लाख 10 हजार 16 मे.टन ऊस गाळप झाले आहे. दोन्ही युनिट मिळून आजअखेर 15 लाख 93 हजार 103 मे.टन उसाचे गाळप झाले आहे.
या हंगाममध्ये दोन्ही युनिटकडे 16 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत गाळपास आलेल्या सर्व उसास जाहीर केले प्रमाणे प्रतिटन रू. 50 अनुदानासह प्रतिटन 2750 रूपये ऊस बिल शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापोटी कारखान्याने 68 कोटी 21 लाख बँकेत जमा केले आहेत.
दोन्ही युनिटकडे ऊसतोडणी वाहतुकीसाठी असलेल्या वाहनचालकांची 15 जानेवारी अखेरपर्यंतची तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली आहेत. वाहतूक बिलापोटी कारखान्याने 16 कोटी 80 लाख बँकेत जमा केले आहे. सभासद व ऊस पुरवठादार शेतकर्यांनी आपला सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट नं.1 व युनिट नं.2 कारखान्यास पुरवठा करून सहकार्य करावे असे संस्थापक अध्यक्ष बबनराव शिंदे यांनी केले आहे.
1 ते 29 फेब्रुवारी दरम्यान गाळपास येणार्या उसास अनुदानासह प्रतिटन 2800 रूपये व 1 मार्चपासून पुढे गाळपास येणार्या उसास प्रतिटन 2850 रूपये प्रमाणे उत्तेजनार्थ वाढीव ऊस दर सर्व ऊस पुरवठादार सभासदा यांना मिळणार आहे. (एकमत, 06.02.2024)