anekant.news@gmail.com

9960806673

पाणीटंचाईचा ऊस क्षेत्राला फटका

उसाचे 50 टक्के क्षेत्र घटले, ठिबक सिंचनाने वाचवता येते पीक

उमरगा ः पावसाचे प्रमाण घटल्याने यंदा अवर्षणस्थितीमुळे शेत शिवाराती पिकाची स्थिती नाजूक झाली आहे. नगरी पीक म्हणून ऊस पिकाची लागवड करण्याकडे शेतकर्‍यांचा वाढलेला होता. मात्र दोन वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे. यंदा तर पाण्याचे स्त्रोत बंद पडल्याने तालुक्यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रातील ऊस पीक मोडीत काढले आहेत.

उमरगा तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. शेत जमीन ओलीताखाली यावी, या हेतूने जवळपास 32 सिंचन प्रकल्पांची निर्मिती झालेली आहे. मात्र 5-7 वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने प्रकल्पात पाणीसाठी तात्पुरत्या स्वरूपाच उपलब्ध होत आहे. दोन वर्षात तर पाण्याची स्थिती नाजूकच झाली आहे.

गत पावसाळ्यात पाऊस अगदी कमी झाल्याने पाण्याचे स्त्रोत बंद पडताहेत. पाणी पातळी खोलवर गेल्याने पाण्याच्या उपलब्धतेसाठी शेतकर्‍यांना नाना तर्‍हेच्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. यंदा तर हिवाळ्यातच प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला होता. फेब्रुवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची दाहकता सुरू झाली आहे. ओलिताखालील पिकांना तर पाण्याची उपलब्धता करण्यासाठी पर्याय सापडत नाहीत.

ऊस पिकाच्या उत्पन्नातून शेतकर्‍यांना चार पैसे अधिक मिळतात. तालुक्यात मुरमचा विठ्ठलसाई साखर कारखाना, समुद्राळचा भाऊसाहेब बिराजदार-क्युएनर्जी साखर कारखाना शेतकर्‍यांसाठी मोठा आधार ठरला आहे. मात्र अवर्षणस्थितीमुळे ऊस लागवड क्षेत्र कमी करावे लागल्याने येणार्‍या काळात या कारखान्यांना उसासाठी धावपळ करावी लागणार आहे.

दरम्यानख शेतातील विहिरींनी तळ गाठला. कुपनलिकेचे पाणी कमी झाल्याने येणार्‍य काही दिवसात ऊस पीक घेण्यासाठी कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचा धोका ओळखून शेतकर्‍यांनी उसाचे क्षेत्र मोडीत काढले. नवीन लागवड करण्याचे धाडस शेतकर्‍यांनी केले नाही. परिणामी ऊस पिकातून मिळणारा फायदा यंदा मिळणार नसल्याने शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे.

उसाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना फायदा होत असला तरी त्यासाठी लागणारे पाणी मोठ्या प्रमाणात लागते. ऊस पिकाला पाण्याची भूक अधिक लागते. पण उपलब्ध पाण्याचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून होत नाही. मोकळ्या पद्धतीने उसाला पाणी देण्यामुळे पाणी अधिक प्रमाणात वाया जाते. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची मोठी बचत होते.

पाणी पातळी खोलवर गेल्याने ओलिताखालील पिके जगवण्यासाठी शेतकर्‍यांना कसरत करावी लागते. ऊस पिकाला सर्वाधिक पाणी लागते. यंदा पाण्याअभावी उसाचे क्षेत्र निम्याहून अधिक घटले. ठिबक पद्धतीच्या पाणी वापरातून जवळपास 60 टक्के पाण्याची बचत होते. प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेेतून 5 हेक्टरच्या मर्यादपर्यंत अल्पभूधारक शेतकर्‍यांना 80 टक्के तर बहुभूधारक शेतकर्‍यांना 75 टक्के अनुदान ठिबकासाठी मिळते. शेतकर्‍यांसाठी टंचाईच्या काळात ही चांगली पर्वणी आहे. - ए.बी. पटवारी, मंडळ कृषी अधिकारी (सकाळ, 01.04.2024)