सांगली ः वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने (दत्त इंडिया) 9500 शेतकर्यांच्या खात्यावर 169 कोटींचे बिले वर्ग केली आहेत. शेतकर्यांना 3150 रूपयांप्रमाणे 31 जानेवारीअखेरची बिले अदा केली आहेत. आजअखेर सुमारे 7 लाख 70 हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे.
वसंतदादा शेतकरी साखर कारखाना 7 वर्षांपूर्वी दत्त इंडिया प्रा.लि. कंपनीला 10 वर्षे कराराने भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला आहे. अडचणीत असलेला हा कारखाना कंपनीने चांगल्या पद्धतीने चालविला असून कारखान्यावर असलेली अनेक देणी देखील दिली जात आहेत. आणखी 3 वर्षे हा कारखाना दत्त इंडियाकडे राहणार आहे. कंपनीच्या 7 वर्षांच्या काळात अपवाद वगळता कामगार व शेतकर्यांची थकित देणीदेखील मिळाली आहेत. गेल्या हंगामात 10 लाख मे.टन गाळप झाले होते. जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस गाळप करण्यामध्ये वसंतदादा कारखाना एक नंबरला होता.
यावर्षीच्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कारखाना चालू होण्यास विलंब झाला होता. तरी देखील दत्त इंडिया कंपनीने आजअखेर 7 लाख 70 हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. आणखी 15 ते 20 दिवस कारखाना सुरू राहण्याची शक्यता आहे. कारखान्याचे गाळप आठ ते सव्वा आठ मे.लाख टन होण्याची शक्यता आहे. दत्त इंडियाने 31 जानेवारीअखेरची बिले 3150 रूपयांनी जमा केली आहेत. सुमारे 9500 शेतकर्यांच्या खात्यावर 169 कोटी रूपये जमा केली आहेत. (जनप्रवास, 06.04.2024)