anekant.news@gmail.com

9960806673

देशात 223 लाख टन साखरेची निर्मिती

उत्पादनात महाराष्ट्र अगे्रसर, कर्नाटकात 15 साखर कारखाने बंद

कोल्हापूर ः देशाचा गळीत हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. 15 फेब्रुवारीअखे देशात 223 लाख टन साखरेचीनिर्मिती झाली आहे. या कालावधी अखेर महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी कायम राखली आहे. राज्यात 79 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 68 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कर्नाटकात 42 लाख टन तयार झाली आहे. गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात 5 लाख टनानीं कमी आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या तीन राज्यात 85 टक्के साखर निर्मिती झाली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीनुसार सध्या देशातील 507 साखर कारखाने सुरू आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 503 साखर कारखाने सुरू होते. यंदा सुरूवातीच्या टप्प्यात महाराष्ट्राचे उत्पादन कमी होते. पण नोव्हेंबरच्या अखेरीनंतर मात्र उत्पादात चांगली वाढ झाली.

गेल्या वर्षी या कालावधीत 2362 लाख टन उसाचे गाळप झाले. यंदा 2268 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. साखर उतार्‍यातही फारशी चढ-उतार पाहायला मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 9.69 टक्के साखर उतारा होता. यंदा 9.86 टक्के साखर उतारा आहे. साखर उतारा थोड्या फरकाने यंदा अधिक आहे.

यंदा या कालावधीत 26 साखर कारखाने बंद झाले आहेत. या मध्ये कर्नाटकात सर्वाधिक 15 साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 8 साखर कारखाने बंद झाले होते. महाराष्ट्रात गेल्या वर्षी या कालावधीत तब्बल 17 कारखाने बंद झाले होते. यंदा ही संख्या 4 आहे. महाराष्ट्रात ऊस हंगाम लवकर संपेल हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जादा संख्येने कारखाने सुरू आहेत. अजूनही किमान एक महिना तरी ऊस हंगाम चालण्याची शक्यता आहे.

यंदा 314 लाख टन साखर निर्मितीचा अंदाज -

उत्तर प्रदेशमध्येेही केवळ एकच कारखाना बंद झाला आहे. कर्नाटक वगळता महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांत अजूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू असल्याचे चित्र आहे. तमिळनाडूत 3 कारखाने बंद झाले आहेत. साखर कारखाने बंद होण्याची गती पाहता यंदा कर्नाटकात इतर राज्यांच्या तुलनेत लवकर हंगाम संपेल, अशी शक्यता आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा 314 लाख टन साखर तयार होईल, असा अंदाज आहे. (अ‍ॅग्रोवन, 19.02.2024)