anekant.news@gmail.com

9960806673

गाळप हंगाम अर्धा संपला, धुराडी मार्चपर्यंत चालणार

जानेवारी अखेरही महाराष्ट्र साखर उत्पादनात आघाडीवर
कोल्हापूर ः देशातील साखर उत्पादनात जानेवारीअखेरही महाराष्ट्राच आघाडीवर आहे. राज्याने 676 लाख टन गाळप केले. सरासरी 9.60 टक्के उतार्‍यासह 65 लाख टनांचे साखर उत्पादन केले. देशात 520 कारखान्यांमधून 1928 लाख टन ऊस गाळप झाले. सरासरी 9.71 टक्के उतार्‍यासह 187 लाख टनांचे नवे साखर उत्पादन झाले. राज्याचा यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने मार्चअखेर ते एप्रिल मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय सहकारी साखर काखाना महासंघ व ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशननेही या अंदाजाला दुजोरा दिला आहे.
सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार दुसर्‍या क्रमांकावरील उत्तर प्रदेशमधील ऊस गाळप 574 लाख टन झाले असून सरासरी 10.5 टक्के उतार्‍यासह 57.65 लाख टन साखर उत्पादन झाले. उत्तर प्रदेशातील हंगाम एप्रिलअखेर ते मे मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे.
तृतीय क्रमांकावरील कर्नाटकने 377 लाख टन ऊस गाळप केले. सरासरी 9.75 टक्के उतार्‍यासह 37 लाख टन साखर उत्पादन झाले. उर्वरित सर्व राज्यातील ऊस गाळप, सरासरी साखर उतारा आणि नवे साखर उत्पादन लक्षात घेता यंदाच्या हंगामाअखेर देश पातळीवरील नवे साखर उत्पादन 314 लाख टनांचे होणे अपेक्षित आहे. परतीचा पाऊस तसेच इथेनॉल निर्मितीकडे वळणार्‍या साखरेवरील निर्बंध यामुळे नव्या उत्पादनात वाढ दिसत आहे.
सुरूवातीच्या अंदाजानुसार राज्याची एकूण ऊस उपलब्धता यंदा 1100 ते 1200 लाख टनांच्या आसपास वर्तवली गेली होती. परंतु, ऐन पावसाळ्यात पावसाचे खंड वाढले. मात्र, अवकाळी पावसाने काही जिल्ह्यात उसाचे चांगले पोषण झाले. राज्यात आधीच्या अंदाजानुसार 85 लाख टन साखर तयार होईल, असे गृहीत धरले होते. परंतु गाळपाचे नियोजन बघता एकूण साखर उत्पादन 95 लाख टनांपर्यंत राहू शकते, असे उद्योगातून सांगण्यात आले.
अपेक्षित साखर उत्पादन गतवर्षीच्या 331 लाख टनांच्या तुलनेत 17 लाख टनांनी कमी असले तरी देशातील साखर उत्पादनांचा ताळेबंद पाहता वर्षअखेर 75 ते 80 लाख टन साखर शिल्लक राहणे अपेक्षित आहे आणि हीच नेमकी बाब आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे केंद्र शासनातील संबंधित मंत्रालयाच्या नजरेस आणली आहे. आणखी किमान 15 लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीकडे वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. जेणेकरून कारखान्यात तयार होऊन पडून असलेल्या बी हेवी मळीचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होऊन आसवनीसमोरील आर्थिक समस्येवर तोडगा निघू शकेल. - जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष
महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने उसाच्या उत्पादनात वाढ होत आहे. याशिवाय नोंदणी नसलेल्या उसाचीही अनपेक्षित उपलब्धता आहे. यामुळे अंतिम टप्प्यात साखरेचे उत्पादन वाढेल. काही ठिकाणी हंगाम संपेल, अशी शक्यता सध्या तरी नाही. राज्यातील हंगाम मार्चअखेरपर्यंत सुरू राहील, असा आमचा नवा अंदाज आहे. - भगत पाटील, अध्यक्ष, ऑल इंडिया शुगर ट्रेड क्रॉप कमिटी
राज्यात अजूनही 50 ते 60 दिवसांपर्यंत चांगला ऊस पुरवठा राहू शकतो. त्यामुळे आणखी किमान 300 लाख टनांपर्यंत ऊस गाळप होण्याची चिन्हे आहेत. - बी.बी. ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा (अ‍ॅग्रोवन, 01.00.2024)