anekant.news@gmail.com

9960806673

ऊस घेता का ऊस, कोणी या शेतकर्‍यांचा ऊस घेता?

वेळेत ऊस न गेल्याने कर्ज फेडायचे कसे, ऊसपिके लागली जळू

नीरा ः पुरंदरचा शेतकरी दुष्काळाशी सामना करताना मेटाकु टीला आला आहे. काहीमोठे क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांनी मोठा खर्च करून उसाचे पीक घेतले आहे. डिसेंबर 2022 मध्ये खोडवा नोंद असलेला ऊस आता तब्बल 16 महिन्यांचा झाला तरी गाळपास न गेल्याने ऊस घेता का ऊस, कोणी या शेतकर्‍याचा ऊस असे म्हणण्याची वेळ येथील शेतकर्‍यांवर आली आहे.

ऊस लागवड झाल्यापासून 12 महिन्यांमध्ये त्याची वाढ पूर्ण होते. त्यामुळे 12 किंवा 13 व्या महिन्यात त्याची तोड होणे गरजेचे असते. अन्यथा वजनात तर घट होतेच, पण उत्पादनही घटते. सध्या लागवड करून 16 महिने झालेला ऊस शेतामध्ये उभा आहे. त्याला तुरे लागण्यास सुरूवात झाली असून ऊस वाळायला लागला आहे. हे कमी म्हणून की काय गेल्या 8 दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे.

शिवाय गेल्या महिन्याभरापासून उसाला पाणीही उपलब्ध नाही. त्यामुळे उभा ऊस वाळून चालला आहे. अधिक काळ ऊस वावरात असल्याने तब्बल 30 ते 40 टक्के वजनात घट झाली आहे. यामधून उत्पादनाची आशा शेतकर्‍यांनी सोडली आहे. शिवाय ऊसतोडणी कामगार ऊसतोडणी कामगार ऊसतोडणी करण्यासाठी ऊस जाळून तोड करीत आहेत. (लोकमत, 24.03.2024)