anekant.news@gmail.com

9960806673

साखर कारखान्यांच्या एमडींना मुदतवाढ

सहकार विभागाचा निर्णय ः 65 वर्षांची वयोमर्यादा
कोल्हापूर ः राज्यातील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचलकांना वयाच्या 65 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. याआधी ही वयोमर्यादा 62 इतकी होती. परंतु यासाठी तब्बल 12 निकष लावण्यात येणार असून, त्यांची पूर्तता झाल्यानंतरच या वाढत्या वयोमर्यादेचा लाभ देता येणार आहे.
साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत व्यक्तीला वयाच्या 60 वर्षानंतर द्यावयाच्या मुदतीसाठी आधी 65 इतकीच वयोमर्यादा करण्यात आली होती. नंतरच्या काळात यामध्ये सुधारणा करून वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदा एक वर्ष आणि त्यानंतर शासनमान्यतेने आणखी एक वर्ष म्हणजे संबंधितांच्या वयाच्या 62 वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याची तरतूद करण्यात आली होती.
यानंतर अनेक कारखान्यांकडून वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होऊ लागल्याने आता पुन्हा वयाच्या मुदतवाढीची मर्यादा 65 करण्यात आली आहे. गुरूवार दि. 01 फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला आहे.
या निकषांची पूर्तता आवश्यक
* संबंधित कार्यकारी संचालकांविरोधात आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता चौकशी प्रस्तावित नसावी.
* मागील 5 वर्षांमध्ये सर्वसाधारण सभेपूर्वी लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करून विहित मुदतीत घेण्यात येणार्‍या सर्वसाधारण सभेपूर्वी लेखापरीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
* संबंधित व्यक्ती आरोग्यदृष्ट्या सक्षम असावी.
एकूणच कारखाना उत्तम पद्धतीने चालवणारी व्यक्ती असेल तरच वयाच्या 65 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा उर्वरित निकषांचा आशय आहे.
याआधीही असा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आता ही मुदतवाढ देताना 12 निकषही ठेवले आहेत. त्यामुळे कारखान्याचे कामकाज उत्तम करणार्‍या, शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आणि मुख्य म्हणजे व्यवस्थापनाची इच्छा असेल असा निकषांमध्ये बसणार्‍या कार्यकारी संचालकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. - विजय औताडे, निर्वत्त व्यवस्थापकीय संचालक, कोल्हापूर (लोकमत, 02.02.2024)