कोल्हापूर ः केंद्र सरकारने जानेवारी महिन्यासाठी 23 लाख टनांचा साखर कोटा गुरूवार दि. 28 डिसेंबर रोजी जाहीर केला. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवरून हा कोटा जाहीर केला आहे. हा कोटा देशातील साखर कारखान्यांना विभागून देण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी केंद्राने 15-15 दिवसांचे कोेटे कारखान्यांना दिले होते. डिसेंबरमध्ये 24 लाख टनांचा कोटा दिला होता. यात 1 लाख टनांनी घट करीत केंद्राने हा साखर कोटा 23 लाख टनांपर्यंत कायम ठेवला आहे. नोव्हेंबरमध्येही 23 लाख टनांचा कोटा दिला होता. सध्या देशाचा हंगाम वेगात सुरू झाला आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून तोडणीस गती आल्यानंतर साखर उत्पादनास वेग आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेने केंद्राने निर्यातीबरोबर इथेनॉल निर्मितीवरही बंधने आणली. देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी 15-15 दिवसांचे कोटे जाहीर कले. जानेवारीसाठी मात्र पूर्ण महिन्याचा कोटा दिला. सध्या तरी देशातील हंगाम चांगला असल्याने पुढील दोन महिन्यात तरी साखरेची टंचाई जाणवणार नाही, असा अंदाज उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला. (अॅग्रोवन, 29.12.2023)