18 कारखाने सुरूच
नांदेड ः काही भागात ऊस शिल्लक असल्याने भर उन्हाळ्यात नांदेड विभागातील 29 पैकी अद्याप 18 साखर कारखाने सुरू आहेत, तर 11 साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. आजपर्यंत या कारखान्यांनी 1 कोटी 16 लाख 4 हजार 194 टन उसाचे गाळप केले आहे. 1 कोटी 18 लाख 39 हजार 500 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावळ यांनी ही माहिती दिली.
नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातून 2023-24 च्या हंगामासाठी 29 कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात 19 खासगी तर 10 सहकारी कारखान्यांचा समावेश होता. गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू झाला होता. 11 कारखान्यांचा हंगाम आटोपला असून ऊस शिल्लक असल्याने 18 कारखाने सुरू आहेत.
परभणी जिल्ह्यातील 7 पैकी 6 कारखाने बंद झाले आहेत. बळिराजा हा खासगी कारखाना सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील 5 पैकी 3 कारखाने बंद झाले असून, भाऊराव चव्हाण डोंगरकडा व पूर्णा कारखाना वसमत सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील 6 पैकी 5 कारखाने बंद झाले असून भाऊराव चव्हाण देगाव सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील 11 पैकी 4 कारखाने बंद झाले आहेत. मांजरा कारखाना, ओंकार कारखाना, विलास कारखाना निवळी, श्री साईबाबा शुगर, जागृती शुगर, रेणा कारखाना, विलास कारखाना तोंडापूर हे कारखाने सुरू आहेत.
* परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी या खासगी कारखान्याने 7 लाख 92 हजार 47 टन उसाचे गाळप केले आहे. ट्वेंटीवन शुगर सोनपेठ या कारखान्याने 7 लाख 55 हजार 710 टन उसाचे गाळप केले आहे. हे दोन्ही कारखाने सध्या बंद झालेे आहेत. (सकाळ, 04.04.2024)