anekant.news@gmail.com

9960806673

राज्यात 42 कारखान्यांचे 3 कोटी मे.टनापेक्षा अधिक गाळप

4 साखर कारखान्यांचा पट्टा पडला, साडेसात कोटींचा टप्पा ओलांडला
सोलापूर ः राज्यात 207 साखर कारखान्यांचे साडेसात कोटी मे.टन ऊस गाळप झाले असून त्यामध्ये 42 साखर कारखान्यांचे 5 लाखांपेक्षा अधिक व एकूण 3 कोटी मे.टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे. राज्यातील 4 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दरम्यान, अवेळी पावसाने उसाच्या वजनात वाढ झाल्याने 10 टक्के गाळप वाढेल, असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे.

राज्यात यंदाच्या गाळप हंगामासाठी 14 लाख हेेक्टर उसाची नोंद झाली आहो. कमी पाऊस पडल्याचा परिणाम ऊस वाढीवर झाल्याने गाळपही कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यात राज्यात अवेळी पाऊस पडला. चांगला पाऊस पडल्याने उसाच्या वाढीसाठी फायदा झाल्याचे कारखानदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अंदाजापेक्षा 10 टक्क्यांपर्यंत गाळप वाढेल असे सांगण्यात आले.

राज्यात सध्या 207 साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला असून, गुरूवारपर्यंत 748 लाख मे.टन गाळप झाले आहे. राज्यात 207 साखर कारखाने गाळप घेतले असले तरी अधिक क्षमतेच्या 42 कारखान्यांनी 3 कोटींपेक्षा अधिक गाळप केले आहे. उर्वरित 165 साखर कारखान्याचे 4 कोटी मे.टनांपेक्षा अधिक गाळप झाले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या तक्त्यावरून दिसत आहे.

दृष्टीक्षेपात महाराष्ट्रातील कारखाने आणि गाळप
* राज्यात पूणे जिल्ह्यातील बारामती अ‍ॅग्रोचे सर्वाधिक 15 लाख 34 हजार, दौंड शुगरचे 14 लाख तर सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे 12 लाख 10 हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर हुपरी, हातकणंगलेने 10 लाख मे.टन गाळप केले आहे.
* राज्यात 40 साखर कारखान्यांचे प्रत्येक 5 लाखांपेक्षा अधिक मे.टन झाले असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 8, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील 6, सातारा जिल्हा 5, सांगली व अहमदनगर प्रत्येकी 4, परभणी व बीड जिल्ह्यात प्रत्येकी 2, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, नंंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येकी एका साखर कारखान्याने 5 लाख मे.टनांपेक्षा अधिक गाळप केले आहे.
* सोलापूर जिल्ह्यातील आष्टी शुगर मोहोळ, रामेश्‍वर भोकरदन, संत मुक्ताबाई मुक्ताईनगर, टोकाई कुंरूंदा, वसमत या कारखान्यांचा पट्टा पडला आहे.
* राज्यातील कोल्हापूर विभागाचे (कोल्हापूर व सांगली जिल्हे) सर्वाधिक 170 लाख, पुणे विभागाचे (पुणे व सातारा जिल्हे) 160 लाख, तर सोलापूर विभागाचे (सोलापूर व धाराशिव) 151 लाख मे.टन इतके झाले आहे. (लोकमत, 11.02.2024)