anekant.news@gmail.com

9960806673

माजलगावात 3 कारखाने, 10 गुर्‍हाळ तरी ऊसतोड होईना

तालुक्यात यावर्षी अखेरपर्यंत 23 लाख मे.टन ऊस गाळप होणार
माजलगाव ः तालुक्यात 3 सहकारी साखर कारखाने व 10 गुर्‍हाळे आहेत. परंतु फेब्रुवारी महिला उजाडला तरी अनेक शेतकर्‍यांचा ऊस अद्याप कारखान्याला गेलेला नाही. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. ऊसतोड यंत्रणा कमी पडत असल्याने शेतकर्‍यांसमोर सध्या ऊसतोड करण्याचे आव्हान आहे.
गेटकेनच्या नावावर डावलण्यात येत असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे. दिवसेंदिवस पाणीपातळी कमी होत असल्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच वाढलेल्या उसाला फुलोरा येण्याआधी तोडणी व्हावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.
* माजलगाव तालुक्यात लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखाना, जय महेश साखर कारखाना व छत्रपती हे साखर कारखाने सुरू आहेत. तर गूळ पावडर, गूळ उत्पादक असे 10 गुर्‍हाळ युनिट परिसरात आहेत.
* तालुक्यात एकूण 23 लाख मे.टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. त्यापैकी सोळंके कारखान्याने 4 लाख 32 हजार, जय महेश कारखान्याने 5 लाख 45 हजार, तर छत्रपती कारखान्यात 3 लाख मे.टन ऊस गाळप झाला. तसेच, विविध खाजगी गुर्‍हाळांद्वारे 15 लाख मे.टन उसाचे गाळप झाले आहे.
* उपलब्ध आकडेवारीच्या आधारे तालुक्यात अद्याप 10 लाख मे.टन उसाचे गाळप बाकी आहे.
* नोव्हेंबर महिन्यातील नोंदी असलेला ऊस अजून शेतातच उभा आहे. जमिनीतील पाणी पातळी खालावत चालली आहे. यामुळे उसाच्या वजनात घट होणार आहे.
* कारखान्याचे प्रशासन नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याची ऊसतोड आज रोजी सुरू असल्याचे सांगत आहेत.
तिन्ही साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांच्या उपलब्ध टोळ्या व यंत्रणा अपुरी पडत असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात येते. यामुळे फेब्रुवारी अर्धा, तर मार्चच्या 1 ते 10 तारखेपर्यंत ऊसतोड होण्यास वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्यांनी स्थानिक सभासद सोडून बाहेरचा ऊस आणण्याला प्राधान्य दिल्याने स्थानिक ऊस उत्पादक शेतकर्‍यांना उशीर होत आहे.
कार्यक्षेत्रातील ऊसतोड करण्याला कारखाना प्राधान्य देत आहे. यावर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात उसाची लागवड वाढलेली होती. यामुळे या महिन्यातील ऊस गाळप करण्याला वेळ लागत आहे. - सुजय पवार, शेतकरी अधिकारी, जय महेश कारखाना (लोकमत, 06.02.2024)