anekant.news@gmail.com

9960806673

केंद्राकडून ऊसतोडणी यंत्र अनुदानासाठी 96 कोटी मंजूर

यंत्रासाठी राज्यांतून 7300 अर्ज दाखल
पुणे ः केंद्र सरकारने ऊसतोडणी यंत्र अनुदानासाठी आर्थिक वर्ष 2023-24 साठी 96 कोटी 39 लाख रूपयांचा अनुदान निधी महाराष्ट्रासाठी मंजूर केलेला आहे. मंजूर अनुदानाच्या 25 टक्के ही रक्कम असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. राज्य सरकारचा अनुदान हिस्सा कृषी विभागाकडून उपलब्ध होण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. योजनेत सहभागासाठी 7300 अर्ज ऑनलाईनवर प्राप्‍त झाले आहेत.
ऊसतोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाची जिल्हा अथवा तालुका स्तरावर लक्ष्यांक न भरता थेट राज्य स्तरावरून सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभाग, साखर आयुक्त आणि मुंबई येथील महाआयटी यांनी परस्पर समन्वय ठेवून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. याबाबतचा प्रत्यक्ष शासन निर्णय 20 मार्च 2023 रोजी निघाला. त्यामुळे 2022-23 मधील 450 ऊसतोडणी यंत्रांचे लक्ष्यांक हे चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वर्ग करून अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनेच्या निकषांनुसार केंद्राचा 60 टक्के आणि राज्याचा 40 टक्के अनुदान हिस्सा आहे.
किमतीच्या 40 टक्के किवा 35 लाख रूपये अनुदान - ऊसतोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलद्वारे होत असून योजनेत ऊसतोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्ति शेतकरी, उद्योजक, सहकारी व खासगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्थांनी (एफपीओ) भाग घेतला आहे. यंत्राच्या खरेदी किमतीच्या 40 टक्के किंवा 35 लाख रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान जीएसटी रक्कम वगळून दिले जाणार आहे. (पुढारी, 12.12.2023)