anekant.news@gmail.com

9960806673

कोल्हापूर जिल्ह्यात 7 कारखान्यांनीच बनवले इथेनॉल

निर्मिती 4 कोटी 42 लाख हजार लिटरची, शेतकर्‍यांना मिळावा लाभ

कोल्हापूर ः जिल्ह्यातील केवळ 7 साखर कारखान्यांनीच यावर्षीच्या गाळप हंगामात इथेनॉलची निर्मिती केली. या गळीत हंगामात जिल्ह्यात 4 कोटी 44 लाख 77 हजार 60 लिटर इथेनॉल तयार झाले. भविष्यात अधिकाधिक कारखाने इथेनॉल तयार करतील, असा अंदाज वर्तविला जात असून, त्यासाठी कारखान्यांना भांडवली गुंतवणूकही करावी लागणार आहे.

देशामध्ये इंधनाचे विविध पर्याय अवलंबिले जात आहेत. यासाठी सरकारच्या धोरणातही बदल होत आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवले असून, त्यानुसार वाहनांच्या इंजिनमध्येही बदल केले आहेत. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने इथेनॉलस्नेही धोरण बनवल्याने देशभरातील अनेक साखर कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळले आहेत.

जिल्ह्यात अद्याप बहुतांशी साखर कारखान्यांना डिस्टिलरी नसल्याने इथेनॉल निर्मिती करता येत नाही. त्यामुळे क्षमता असूनही अपेक्षित प्रगती करू शकलेली नाही. जे कारखाने इथेनॉल निर्मितीमधून नफा मिळवतात त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने धोरण ठरवणे गरजेचे आहे.

इथेनॉलला साखरेपेक्षा अधिक दर मिळतो. त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन वाढले. पण त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळत नाही. यासाठी उसापासून इथेनॉल निर्मितीमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनी उतरले तरच निर्मिती वाढेल आणि उसाला 4500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळू शकेल. - शामराव देसाई, अध्यक्ष, जैवइंधन शेतकरी संघटना

ज्या साखर कारखान्यांना स्वतःची डिस्टलरी आहे तेच इथेनॉलची निर्मिती करू शकतात. साखर कारखान्यांनी आता साखर आणि इथेनॉल याचा बाजारपेठेतील दराप्रमाणे समन्वय ठेऊन उत्पादन करावे. त्यातून बाजारातील साखरेचे दरही नियंत्रणात राहतील आणि कारखान्यांनाही पैसे मिळतील. - विजय औताडे, साखर उद्योग तज्ञ

दरातील तफावत - ज्या काळात उसाचा गाळप हंगाम सुरू होतो त्यावेळी साखरेपेक्षा इथेनॉलचे दर अधिक होते. त्यामुळे त्याकाळात इथेनॉल विक्री करणार्‍या कारखान्यांना अधिक लाभ झाला. मात्र, त्यानंतर साखरेचे भाव वाढले. सध्या साखर 3600 ते 3700 रूपये क्विंटल आहे. त्यामुळेे इथेनॉलपेक्षा साखर विक्रीतून अधिक नफा मिळतो. भविष्यात गणपती, नवरात्री, दिवाळी याकाळातही साखरेचे भाव वाढतील अशी शक्यता साखर व्यापारी करत आहेत. (सकाळ, 11.06.2024)

साखर कारखाना इथेनॉल निर्मिती
(किलो लिटरमध्ये)
दत्त शिरोळ साखर कारखाना 2009.1
तात्यासाहेब कोरे साखर कारखाना 6,558.50
दालमिया भारत साखर कारखाना 10,849.26
श्री गुरूदत्त शुगर, टाकळीवाडी 14,593.52
संताजी घोरपडे साखर कारखाना 950.15
डॉ. डी.वाय. पाटील साखर कारखाना 6,103.02
छत्रपती शाहू साखर कारखाना 3,213.00
एकूण 44,277.06