anekant.news@gmail.com

9960806673

माजलगावात उसाच्या उत्पादनात निम्म्याने होणार घट

माजलगाव ः मागील वर्षीच्या पावसाळ्यात तालुक्यातील पर्जन्यमान तुलनेत निम्याने कमी झाले. यामुळे धरण मृत साठ्यात गेले आहे. परिणामी तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीने आगामी गाळप हंगामात उसाच्या क्षेत्रात निम्याने घट होणार असून 3 साखर कारखाने, 2 गुळ पावडर निर्मिती कारखाने व गुर्‍हाळ उद्योगांवर संकट ओढावण्याचे चिन्हे आहेत.

माजलगाव धरण मागील 3-4 वर्षे सतत भरत असल्याने शहरासह तालुका परिसरात मुबलक पाण्याची उपलब्धता होती. त्यामुळे बहुतांशी शेतकर्‍यांनी ऊस पिकाची लागवड केली होती. गाळपास मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होत असल्याने गुर्‍हाळ उद्योगांची संख्या देखील तालुका परिसरात वाढली होती.

परंतु पावसाअभावी यावर्षी धरण भरले नाही. परिणामी धरणातून शेती सिंचनाला हिवाळा आणि उन्हाळ्यात मिळणारे सात ते आठ आवर्तने मिळाली नाहीत. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या अनेक शेतकर्‍यांना उसाचे पिक मोडावे लागले. तर नव्याने लागवड केलेल्या शेतकर्‍यांना देखील शेतातील विहीर, विंधन विहिरीला पाणी उपलब्ध नसल्याने पहिल्याच वर्षी ऊस पिकांवर नागर फिरवावा लागला आहे.

तालुका परिसरात लोकनेते सुंदरराव सोळंके, छत्रपती असे 2 सहकारी तर पवारवाडी येथे जय महेश हा खासगी कारखाना असे 3 साखर कारखाने. तर मागीेल वर्ष दीड वर्षाच्या काळात झालेले दोन गुळ पावडर निर्मिती व इतर छोटे मोठे 15 ते 20 गुर्‍हाळ उद्योग आहेत. परंतु आगामी हंगामात मात्र या उद्योगांवर व साखर कारखान्यांवर ऊस उपलब्धतेची टांगती तलवार असणार आहे. (सकाळ, 03.06.2024)