anekant.news@gmail.com

9960806673

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशचा साखर कोटा घटविला, जादा साखर विक्री केलेल्या कारखान्यांवर कारवाई

कोल्हापूर ः केंद्राने जूनच्या कोट्यातील साखर वाटप करताना महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या साखर उत्पादनातील राज्यांचा साखर कोटा घटविला आहे. महाराष्ट्राचा कोटा मेच्या तुलनेत 8 टक्क्यांनी तर उत्तर प्रदेशचा कोटा दीड टक्क्यांनी घटविला आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांनाही 11 टक्के साखर कोटा कमी मिळाला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत बिहारला सर्वाधिक 14 टक्के कोटा वाढवून दिला आहे.
दोन महिन्यांपूर्वी केंद्राने दिलेल्या साखर कोट्याइतकीच साखर कारखान्यांनी विकावी, असे आदेश काढले होते. एखादा कारखाना कोट्यापेक्षा जास्त साखर विकत असेल तर त्यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्याची अंमलबजावणी तातडीने करताना केंद्राने देशातील 63 कारखान्यांना गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी कोटा दिला. हे कारखाने प्रामुख्याने उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील असल्याने या दोन राज्यांच्या एकूण साखर कोट्यावर या कारवाईचा परिणाम झाला आहे.

केंद्राने दोन दिवसांपूर्वीच कारखान्यांना 25.50 लाख टनांचा कोटा जाहीर केला. हा कोटा जाहीर करण्यापूर्वी कोणत्या कारखान्यांना किती साखर विकली याचे निरीक्षण केले. काही कारखान्यांनी कोट्यापेक्षा जास्त साखर विकून आदेशाचा भंग केल्याचे निदर्शनास येताच या कारखान्यांवर कोटा घटीची कारवाई केली.

मे च्या पूर्वाधात काही कारखान्यांनी जादा साखर विक्रीचा प्रयत्न केला. पण कारखान्यांनी केलेली जादा साखर विक्री केंद्राला रूचली नाही. त्यांनी या कारखान्यांवर कोटा कपातीची कारवाई करत आपला इरादा स्पष्ट केला. केंद्राने बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान या राज्यांचे साखर कोटे मेच्या तुलनेत वाढविले. आंध्रप्रदेश, गुजरात, हरियाना, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड आदी राज्यातील कारखान्यांना साखर कोटे कमी मिळाले आहेत.

राज्यांना मिळालेला साखर कोटा

साखर कोटा (टनांत)
आंध्र प्रदेश 16829
बिहार 60448
छत्तीसगड 4152
गुजरात 82511
हरियाना 54475
कर्नाटक 311331
मध्य प्रदेश 57522
महाराष्ट्र 935805
ओडिशा 528
पंजाब 39392
राजस्थान 2108
तमिळनाडू 61583
तेलंगणा 3969
उत्तर प्रदेश 890813
उत्तराखंड 26735 (अ‍ॅग्रोवन, 02.06.2024)