अंतिम दर काही ठरेना, कारखान्यांनी वाढवला वाहतूक खर्च
सातारा ः सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगामाची सांगता झाली. केंद्राने इथेनॉल निर्मितीला बंदी घातल्याने यंदा कारखानदारांना साखरेची अतिरिक्त निर्मिती करावी लागली. तरीही सातारा जिल्ह्याची साखर उतार्याची धाव 11.44 टक्क्यांपर्यंत गेली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच सर्वच कारखान्यांनी सरासरी 3100 रूपयांची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर वाढीव उतार्याचा एकही रूपया अद्याप कारखान्यांनी शेतकर्यांना दिलेला नाही. साखर आयुक्त कार्यालयाकडून रिकव्हरी लॉसचा अहवाल प्राप्त न झाल्याने मात्र हक्काच्या एफआरपीसाठी ताटकळत राहावे लागत आहे.
सातारा जिल्ह्यातील 17 कारखान्यांनी हंगामात 1 कोटी 5 लाख 18 हजार 67 टन उसाचे गाळप करून 1 कोटी 10 लाख 23 हजार 18 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये गळीत हंगामाला सुरूवात झाली. परंतु, कारखानदारांनी तब्बल दोन महिने शेतकर्यांना झुलवत ठेवून एफआरपीच जाहीर केली नव्हती. जिल्हाधिकार्यांनी नोटिसा धाडून बैठक लावली. या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी कारखानदारांची कानउघडणी केल्यानंतर बहुतांश कारखानदारांनी 3100 रूपये दर देण्याचे जाहीर केले होते.
हंगाम जस पुढे सरकू लागला तसतशी कारखानदारांनी एफआरपी अदा केली. मात्र, अनेक कारखान्यांनी आपल्या वाहतूक तोडणीचा खर्च वाढवून एफआरपीला कात्री लावली आहे. त्यामुळे कागदोपत्री खेळ करत शेतकर्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम केले. अनेक कारखानदारांनी जी एफआरपी जाहीर केली होती त्यापेक्षा कमी दर दिला आहे. अद्याप उतारा आणि एफआरपीची अंतिम आकडेवारी जाहीर झालेली नाही. तरीही अनेकांनी पूर्ण एफआरपी दिल्याचा डिंडोरा पिटला आहे.
जाहीर केलेला दर न दिल्याने यंदाही शेतकरी संघटनेच्या 3500 रूपयांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत. सध्याच्या घडीलाही किसन वीर भुईंज, किसन वीर खंडाळा, प्रतापगड, ग्रीन पॉवर या 4 कारखान्यांनी पूर्ण एफआरपी अदा केलेली नाही.
सातार्यातील कारखानदारांनी जाहीर केलेले ऊस दर
शरयू- 3151 रूपये, स्वराज्य ग्रीन- 3101, अजिंक्यतारा- 3100, सह्याद्री- 3100, देसाई- 2850, जरंडेश्वर- 3100, कृष्णा- 3100, जयवंत- 3100, दत्त इंडिया- 3100, रयत अथणी- 3100, माण खटाव- 3051, श्रीराम- 3051, ग्रीन पॉवर- 3006, किसन वीर- 3000, प्रतापगड- 2850
साखर उतार्यावर उसाला दर द्यावा लागत असल्याने जिल्ह्यातील साखर कारखाने आता कमी उतारा दाखवत आहेत. त्यामध्ये खासगी कारखाने आघाडीवर आहेत. कारखान्यांनी दाखवलेला उतारा तपासण्यासाठी साखर आयुक्तांची यंत्रणा प्रामाणिकपणे काम करताना दिसत नसल्याने शेतकर्यांच्या उसाला कमी दर मिळतो. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना (पुढारी, 26.05.2024)