वैरणीसाठी ऊस तोडणार्यांनाच ठेका; नागाव, मौजे वडगाव परिसरात केविलवाणी स्थिती
नागाव : एकरी सहा हजार घ्या, पण ऊस तोडा, अशी केविलवाणी अवस्था ऊस उत्पादक शेतकर्याची झाली आहे. खुद तोडणी माध्यमातून ऊस उत्पादक शेतकर्यांनी वैरणीसाठी ऊस तोडणार्यांनाच तोडणीचा ठेका दिला आहे.
त्यामुळे पूर्वी जनावरांना वैराण (वाढे) मिळण्यासाठी ऊस तोडणार्यांना आता वैरणीसोबत प्रती गुंठा दीडशे रूपये मजुरीही मिळू लागली आहे. साखर कारखान्यांची अपुरी यंत्रणा, ऊस तोडणी मजुरांकडून ऊस वाहतूकदारांची झालेली फसवणूक, तोडी लांबल्यामुळे पाण्याअभावी होत असणारे उसाचे नुकसान या पार्श्वभूमीवर आता शेतकर्यांना खुद्द तोडणीशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे शेतकरी तोडणीचा खर्च भागवतोय आणि कारखाना भरणी तसेच वाहतूक खर्च देतोय. वेळेत ऊस जात नसल्याने शेतकर्यांनी दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.
नागाव, मौजे वडगाव परिसरात विविध कारखान्यांचे कार्यक्षेत्र आहे. पण, कारखान्याकडे ऊस तोडणी मजुरांचा अभाव, छोट्या क्षेत्रासाठी ऊस तोडणी यंत्राव्दारे तोडीस असणार्या तांत्रिक अडचणी या सर्वांचा विचार करता छोट्या ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊस तोडणीस मिळत नसल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. शिवाय कारखान्यांनाही गाळप क्षमतेसाठी उसाची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकर्यांनीच कारखान्यांच्या चीट बॉयना विनंती करत खुद्द तोडणीची चिठ्ठी घेऊन तोडणी सुरू केली आहे.
मौजे वडगाव येथे सुमारे चाळीस शेतकरी जे जनावरांना चारा मिळावा यासाठी ऊस तोडणी करत होते. आता चार्यासोबत मजुरीही मिळू लागल्याने सुमारे बारा एकर ऊस क्षेत्राची तोडणी पूर्ण झाली आहे. नागावात वैरणीसाठी ऊस तोडणार्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रती गुठा दीडशे रूपये घेऊन नागावात ऊस तोडणी या माध्यमातून पूर्ण झाली आहे. (सकाळ, 23.01.2024)